बायकोपासून लपवले ५ लाख, शेतात पुरले अन्...

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
बालोत्रा,
hid 5 lakh from his wife राजस्थानमधील बालोत्रा येथे पैशांशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी आणि कुटुंबीयांपासून पैसे लपवण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याला तब्बल ५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. प्लॉट विकून मिळालेली रक्कम चोरीला जाऊ नये म्हणून त्याने नोटांची पिशवी शेतातील जमिनीत पुरली. मात्र, काही काळानंतर पैसे नेमके कुठे पुरले होते, हेच त्याला आठवेना. अखेर जवळपास वर्षभरानंतर ही पिशवी सापडली; पण तोपर्यंत वाळवीने त्यातील बहुतांश नोटांची अक्षरशः नासधूस केली होती.
 
hid 5 lakh from his wife
 
बालोतरातील मांगिलाल मेघवाल यांनी जमीन विकल्यानंतर त्यांना ५ लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम चोरीला जाण्याची भीती त्यांना होती. त्याचबरोबर पत्नीच्या हातूनही पैसे खर्च होऊ नयेत, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी शेतात खड्डा खोदून ५ लाख रुपयांची रोकड पुरून ठेवली. मात्र, पैसे कुठे ठेवले याची जागा लक्षात न राहिल्याने त्यांनी बराच काळ शेतात शोध घेतला. अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना रोकड सापडली नाही.
 
अखेर पैसे सापडत नसल्याने मांगिलाल यांनी ही बाब पत्नी आणि मुलांना सांगितली. सुरुवातीला कुटुंबीयांनाही त्यांच्यावर विश्वास बसला नाही. मात्र, त्यांनी सर्व प्रकार समजावून सांगितल्यानंतर कुटुंबीयांनीही शेतात पैसे शोधण्यास सुरुवात केली. तरीही त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
 
दरम्यान, पैसे पुरून जवळपास एक वर्ष उलटल्यानंतर पावसाळ्यात शेतात पेरणीची तयारी सुरू झाली. त्याचवेळी जमिनीत पुरलेली नोटांची पिशवी अचानक बाहेर आली. मांगिलाल यांची पत्नी आणि मुलाला ही पिशवी सापडली. पिशवी उघडल्यानंतर त्यात ५०० रुपयांच्या नोटांचे गठ्ठे असल्याचे दिसले. मात्र, नोटांची अवस्था पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. जमिनीत बराच काळ राहिल्यामुळे वाळवीने नोटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अनेक नोटांचे अक्षरशः तुकडे झाले होते.
 
खराब झालेल्या नोटा घेऊन मांगिलाल यांची पत्नी आणि मुलगा पचपदरा येथील एसबीआयच्या शाखेत पोहोचले. मात्र, नोटांची अवस्था पाहिल्यानंतर बँकेने त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी बालोतरातील एसबीआयच्या मुख्य शाखेतही धाव घेतली. तेथेही खराब झालेल्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत.
 
चोरीपासून पैसे वाचवण्यासाठी मांगिलाल यांनी कुटुंबापासून ५ लाख रुपये लपवले; मात्र पैसे सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नातच मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, पैसे पुरलेली जागा विसरल्यामुळे जवळपास वर्षभर ती रोकड जमिनीतच राहिली आणि अखेरीस वाळवीने नोटांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. या घटनेनंतर मांगिलाल यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांनाच दोष दिल्याचे सांगितले जात आहे.