तळेगाव (श्यां.पं.),
ashti chimur bus service सन १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात आष्टी आणि चिमूर येथील हुतात्म्यांनी दिलेले बलिदान स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले. या हुतात्म्याच्या स्मृती सदैव जागृत राहाव्या, या उद्देशाने चिमूर आगाराच्या वतीने पूर्वी सुरू करण्यात आलेली आष्टी-चिमूर शहीद स्मृती जलद बससेवा कालांतराने सन २००२ मध्ये बंद झाली होती. तब्बल २४ वर्षांपासून बंद असलेली ही ऐतिहासिक बससेवा अखेर शनिवार ८ ऑगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्यात आली.
बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी भाजपाचे तालुका महामंत्री ॲड . मनीष ठोंबरे, भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक विजयकर व त्यांच्या सहकार्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तळेगाव डेपो आगार प्रमुख बेलोरकर व सहायक आगारप्रमुख विद्या ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. आष्टी व चिमूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे योगदान लक्षात घेऊन आगारप्रमुख विद्या ठाकरे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ८ ऑगस्टपासून बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार शनिवारी सकाळी ८ वाजता आष्टी-चिमूर जलद बससेवेचा शुभारंभ वर्धा जिल्हा भाजपाचे महामंत्री कमलाकर निंभोरकर आणि कृष्णा ऊर्फ दयानंद महाराज हिरुडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी तळेगावचे सहायक आगारप्रमुख विद्या ठाकरे तसेच बस चालक व वाहक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ॲड. मनीष ठोंबरे, अशोक विजयकर आणि कमलाकर निंभोरकर यांनी मनोगत व्यक्त करून बससेवा पुन्हा सुरू केल्याबद्दल आगारप्रमुख विद्या ठाकरे यांचे आभार मानले. विद्या ठाकरे यांनी ही बससेवा अखंडितपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आष्टी येथून दररोज सकाळी ६ वाजता चिमूरसाठी बस रवाना होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
शुभारंभ कार्यक्रमाला अॅड. मनीष ठोंबरे, सोनू भार्गव, अशोक विजयकर, प्रमोद गुप्ता, अतुल गुल्हाने, आवेज खान, सुधाकर गांजुडे, श्याम नवलाखे, भरत वनझारा, मारोतराव काकडे, संजय हिरुडकर, रामराव राऊत, दिनेश इंगळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.