रानभाज्यांचा समावेश आवश्यक : डॉ. भोयर

रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
वर्धा,
wild vegetable आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस, शुद्ध आणि चांगले खाद्य शरीरात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे विशिष्ट कालावधीत उपलब्ध होणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रानभाज्या प्रत्येकानेच आपल्या आहारातला एक भाग बनविला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 
dr bhoyar
 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी विभाग व आत्माच्यावतीने आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आत्माच्या प्रकल्प संचालक राणी गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी रोहन झांजरे, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर चवणे आदी उपस्थित होते.
 
यावेळी पालकमंत्र्यांनी फित कापून महोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच प्रत्येक स्टॅालला भेट देऊन महोत्सवात ठेवण्यात आलेल्या रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांची गुणवैशिष्टे शेतकर्यांकडून समजून घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते प्रगतीशील शेतकर्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यामध्ये पवणी येथील महिला शेतकरी प्रतिभा महाजन, समुद्रपूर येथील शोभा गायधने तसेच दीपक बर्डे, नंदकिशोर गावंडे यांचा समावेश आहे.
 
 
महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक गटातील शेतकरी, सदस्यांनी सहभागी होऊन रानभाज्या विक्री व प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. सोबत नैसर्गिक उत्पादने देखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. रानभाज्यांमध्ये कुंजर, अंबाडी, पाथरी, कारडू, कपाळफोडी, गवती चहा, शेवगा, करवंद, अळू, चिवर, गोडनिम, तरोटा, राजगिरा, आघाडा, केना, सुरण, फास बरबटी, कुकडा, घोगली, ताजे मशरुम, भूईनीम, आंबटचुका, मायाळू/पोई, माठ, गुळवेल, करवंदाचे लोणचे, अंबाडीचे सरबत, पावडर, भाकर, लोणचे, बेलाचे लोणचे, सरबत प्रदर्शनात उपलब्ध होत्या.
 
महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेले अंबाडी व मिक्स भाकरी आदी स्टॉल देखील मांडण्यात आले होते. पालकमंत्री भोयर यांनी स्वत: अंबाडीच्या भाकरीचा आस्वाद घेतला. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन रानभाज्यांचे महत्व समजून घेत खरेदी केली.