कोलंबो,
Indian batsmen in form ahead of the Test भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून कोलंबो येथे दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय संघ श्रीलंका इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. भारतीय संघाने आपला पहिला डाव ३५७/६ या धावसंख्येवर लवकर घोषित केला. या डावात पाच भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या सामन्यात भारताचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याने अप्रतिम तंत्र आणि दर्जाचे प्रदर्शन करत १६४ चेंडूंमध्ये १४२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. १८ चौकारांचा समावेश असलेल्या या शतकी खेळीमुळे पहिल्या कसोटी सामन्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरील त्याचे स्थान जवळजवळ पक्के मानले जात आहे. दुसरीकडे, अष्टपैलू रवींद्र जडेजाने पहिल्या दिवशी ६४ धावांत दोन बळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजीतही चमक दाखवली. जडेजाने ११७ चेंडूंचा सामना करत नाबाद ६३ धावा केल्या. अन्य फलंदाजांना सराव संधी मिळावी यासाठी तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडला.
फिरकी अष्टपैलू मानव सुथार याने पहिल्या दिवशी दोन बळी टिपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ९० चेंडूंमध्ये ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झालेल्या केएल राहुलने ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६७ चेंडूंमध्ये ४० धावा करत संघाला भक्कम सुरुवात मिळवून दिली, मात्र त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. याशिवाय, उंच आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने टी-२० शैलीत आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १८ चेंडूंमध्ये ३६ धावा कुटल्या. यामध्ये ब्रारने २ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार खेचत सर्वांना प्रभावित केले.