कॅनडामध्ये भारतीय तरुणीची हत्या!

७ महिन्यांनी आरोपी टोरोंटो विमानतळावर अटकेत

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
टोरोंटो,
Indian young woman murdered in Canada कॅनडातील टोरोंटो शहरात भारतीय वंशाच्या एका तरुणीच्या हत्येनंतर तब्बल सात महिन्यांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी ३० वर्षीय हिमांशी खुराना हिचा टोरोंटोमधील एका घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत हे प्रकरण 'जवळच्या जोडीदाराकडून झालेल्या हिंसाचारा'चे असल्याचे तपासात स्पष्ट केले होते. या हत्येप्रकरणी हिमांशीचा जोडीदार आणि टोरोंटोचाच रहिवासी असलेला ३२ वर्षीय अब्दुल गफूरी मुख्य आरोपी होता. त्याच्यावर प्रथम श्रेणी हत्येचा गंभीर आरोप लावून पोलीस त्याचा तीव्रतेने शोध घेत होते. शुक्रवारी त्याला टोरोंटो विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली. टोरोंटोच्या फरारी आरोपी शोध पथक आणि हत्या तपास युनिटच्या अधिकाऱ्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली. मात्र, आरोपी कॅनडातून कोणत्या देशात पळून गेला होता, याबद्दल पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे.
 
 
 
Indian young woman murdered in Canada
 
हिमांशी खुराना १९ डिसेंबरच्या रात्री गायब झाली होती. रात्री सुमारे १०:४१ वाजता स्ट्रॅचन अव्हेन्यू आणि वेलिंग्टन स्ट्रीट वेस्ट परिसरातून ती बेपत्ता झाल्याची नोंद टोरोंटो पोलिसांकडे झाली होती. त्यानंतर पोलिसांनी लागलीच शोधमोहीम सुरू केली असता, दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता त्याच भागातील एका बंद घरात तिचा मृतदेह सापडला. ही घटना टोरोंटो शहरातील २०२५ मधील ४० वी खुनाची घटना ठरली होती. तपासादरम्यान गफूरी आणि हिमांशी यांच्यातील जवळचे संबंध समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात देशव्यापी वॉरंट जारी केले होते, तसेच त्याचा फोटो प्रसिद्ध करून नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर टोरोंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने तीव्र दुःख व्यक्त करत हिमांशीच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले होते.