भारत-पाक सीमेवर घुसखोराची डाव उधळला

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
अमृतसर,
Infiltrators on Indo-Pak border पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने हाणून पाडला. दाओके गावाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयितावर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. या कारवाईत त्याचा मृत्यू झाला. दाओके गावाजवळील काटेरी कुंपण परिसरात बीएसएफचे जवान नियमित गस्त घालत असताना त्यांना झुडपांमध्ये संशयास्पद हालचाल दिसली. जवानांनी तेथे असलेल्या व्यक्तीला बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर संशयित बाहेर आला आणि काटेरी कुंपणाच्या दिशेने पुढे सरकू लागला.
 
 

Infiltrators on Indo-Pak border 
 
जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भारतीय हद्दीच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती लक्षात घेऊन बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. या कारवाईत संशयित जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच बीएसएफने घरिंदा पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची तपासणी केली. मृत व्यक्तीकडे ओळख पटवणारे कोणतेही ओळखपत्र किंवा अन्य कागदपत्र सापडले नसल्याने त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
 
तपासादरम्यान घटनास्थळावरून कोणतीही प्रतिबंधित वस्तू किंवा संशयास्पद साहित्य आढळले नसल्याची माहिती आहे. बीएसएफ जवानांच्या तक्रारीवरून घरिंदा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला असून, संबंधित व्यक्ती सीमा भागात कोणत्या उद्देशाने आली होती, याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. सीमा परिसरात जवानांची गस्त आणि निगराणी वाढवण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. संशयिताची ओळख आणि घुसखोरीमागील नेमका उद्देश तपासातून स्पष्ट होणार आहे.