मुंबई
maharashtra law admissions राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ३ वर्षे आणि ५ वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रथम फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची तारीख वाढवण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत.
त्याचप्रमाणे, विधी प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. मान्यताप्राप्त महाविद्यालयांच्या यादीत मोठी वाढ झाली असून अनेक नवीन महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेसाठी खुली झाली आहेत.
३ वर्षीय एल एल बी साठी ५३ नवीन महाविद्यालये उपलब्ध राज्यात ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ३ वर्षीय विधी प्रवेशासाठी केवळ ९३ महाविद्यालये उपलब्ध होती. मात्र, आता त्यात तब्बल ५३ नवीन महाविद्यालयांची भर पडली असून, विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी एकूण १४६ महाविद्यालये उपलब्ध झाली आहेत.
५ वर्षीय एल एल बी च्या यादीत ४५ महाविद्यालयांची भर ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी ५ ऑगस्टपर्यंत ५६ महाविद्यालये उपलब्ध होती. त्यात आता ४५ नवीन महाविद्यालयांची भर पडल्याने एकूण संख्या १०१ महाविद्यालयांवर पोहोचली आहे.
एकूण २४७ महाविद्यालयांचा पर्याय खुले! दोन्ही अभ्यासक्रमांचा विचार करता, आतापर्यंत एकूण ९८ नवीन महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे सध्या राज्यात ३ व ५ वर्षीय विधी प्रवेशासाठी एकूण २४७ महाविद्यालये उपलब्ध झाली आहेत.
अजूनही काही नवीन विधी महाविद्यालये या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या अद्ययावत यादीसाठी आणि ताज्या माहितीसाठी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.