मुंबई
milk price hike महाराष्ट्रात दूधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, नव्या दरांची अंमलबजावणी ११ ऑगस्टपासून होणार आहे. त्यानुसार गायीच्या दुधाचा दर आता ६२ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर ७८ रुपये प्रतिलिटर असेल. यापूर्वी गायीचे दूध ६० रुपये आणि म्हशीचे दूध ७६ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते.
दूध वाहतुकीचा खर्च वाढल्याने तसेच शेतकऱ्यांकडून दूध संकलित करण्यासाठी होणारा खर्च वाढल्यामुळे दरवाढ करणे आवश्यक झाल्याचे डेअरी संचालकांचे म्हणणे आहे. गायी आणि म्हशी या दोन्ही प्रकारच्या दुधाच्या दरात वाढ झाल्याने राज्यभरातील ग्राहकांवर या दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच वाढत्या दरांचा ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणि दूध दराबाबतच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, दूधासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात संसदेत स्पष्ट केले होते. दूधाचे दर बाजारातील परिस्थितीनुसार सहकारी संस्था आणि खासगी डेअऱ्यांकडूनच निश्चित केले जातील, असे सरकारने सांगितले आहे. लोकसभेतील एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांनी ही माहिती दिली. सध्या दूधाचे दर सहकारी संस्था आणि खासगी डेअऱ्या ठरवतात आणि या वस्तूसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुग्ध उत्पादकांच्या हिताचे संरक्षण, दूधाच्या किमती स्थिर ठेवणे, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आणि देशभरातील गुणवत्ता नियंत्रण अधिक मजबूत करणे यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
दूध उत्पादकांना संघटित क्षेत्रात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ग्रामस्तरावर डेअरी सहकारी संस्थांची स्थापना आणि विद्यमान संस्थांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला आहे. मार्च २०२६ पर्यंत ग्रामस्तरावर ३६,२८३ नव्या डेअरी सहकारी संस्था (डीसीएस) स्थापन करण्यात आल्या असून, ३१,१५० संस्थांना बळकटी देण्यात आली आहे. याशिवाय दररोज १६८ लाख लिटर दूध शीतकरणाची क्षमता विकसित करण्यात आली असून, ७६,७४८ गुणवत्ता तपासणी उपकरणांचे वितरण करण्यात आले आहे. दररोज ४१८ लाख लिटर दूध प्रक्रिया आणि मूल्यवर्धन क्षमता असलेल्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, milk price hike भारतात २०२४-२५ या वर्षात २४८ दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) दूध उत्पादन झाले. २०१४-१५ मध्ये हे उत्पादन १४६ दशलक्ष मेट्रिक टन होते. म्हणजेच गेल्या दहा वर्षांत देशातील दूध उत्पादनात सुमारे ६९ टक्क्यांची वाढ झाली आहे. पशुधनाच्या जातींचा विकास, अनुवांशिक सुधारणा, मोफत कृत्रिम रेतन, लिंगनिश्चित वीर्य आणि इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) यांसारख्या उपाययोजनांमुळे ही वाढ झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत १७.२७ कोटी कृत्रिम रेतन करण्यात आले असून, त्याची व्याप्ती २० टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या उपाययोजनांमुळे दूध उत्पादनात ६७ टक्क्यांची वाढ झाल्याचेही सरकारने नमूद केले आहे.