कोलकाता
mamata banerjee पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हॅलिशहर येथे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर संतप्त जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. एका मृत तृणमूल काँग्रेस (TMC) कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्याला जमावाने अडवले. त्यानंतर आंदोलकांनी ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून चिखल, पाण्याच्या बाटल्या, बूट आणि चपला फेकल्या. जमावाने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना ‘चोर’ तसेच ‘डाकूंची राणी’ अशा शब्दांत लक्ष्य केले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सुरक्षा कडे तयार केले आणि ममता बॅनर्जी यांना त्या परिसरातून सुरक्षित बाहेर काढले.
या हल्ल्याबाबत ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीतच काही समाजकंटकांनी त्यांच्या वाहनावर मोठमोठे दगड फेकल्याचा दावा त्यांनी केला. “मोठा-मोठा दगड मारला गेला, माथा फटला असता,” असे सांगताना, वाहनाच्या खिडक्या उघड्या असत्या तर त्यांचे डोके फुटले असते आणि वाहनातील सर्व लोकांचा जीवही गेला असता, असे त्यांनी म्हटले.
आपल्या आयुष्यात यापूर्वी असे कधीही पाहिले नसल्याचे सांगत ममता बॅनर्जी यांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या थेट उपस्थितीत हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पोलीस भाजपला सुरक्षा देत असल्याचा आरोप करत, “अखेर हे सगळं काय चाललं आहे? राज्यातील परिस्थिती कोणत्या दिशेने जात आहे?” असा सवाल त्यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी शुक्रवारी पोलीस कोठडीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या स्थानिक तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होत्या. त्यांचा ताफा हॅलिशहरमध्ये पोहोचताच आधीपासून जमलेल्या संतप्त नागरिकांनी आणि आंदोलकांनी वाहनांचा मार्ग अडवला.
काही क्षणांतच परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली. आंदोलकांनी ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर वाहनावर चिखल फेकण्यात आला. पाण्याच्या बाटल्या, बूट आणि चपला वाहनाच्या दिशेने फेकण्यात आल्या. परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला असून आंदोलकांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तीव्र आणि आक्रमक घोषणाबाजी केली. त्यांना ‘चोर’ आणि ‘डाकूंची राणी’ अशी हेटाळणीही करण्यात आली.
तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे स्थानिकांमध्ये आधीपासूनच संतापाचे वातावरण होते. मृत कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस कोठडीत असताना झालेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला होता. ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याच्या वेळी हाच संताप उघडपणे समोर आला.
जमाव आक्रमक झाल्यानंतर mamata banerjee घटनास्थळी उपस्थित सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी सुरक्षा कडे तयार करून जमावाला नियंत्रित केले आणि ममता बॅनर्जी यांना त्या तणावपूर्ण परिसरातून सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाकडूनही खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.