अर्जेंटिना,
Messi's father passes away. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेस्सीचे वडील आणि दीर्घकाळ त्याचे एजंट व सल्लागार राहिलेले जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मेस्सीच्या बालपणीच्या न्यूवेल्स ओल्ड बॉईज क्लबने त्यांच्या निधनाची पुष्टी करत शोक व्यक्त केला आहे.जॉर्ज मेस्सी हे केवळ मुलाच्या वैयक्तिक आयुष्यातील आधार नव्हते, तर त्याच्या फुटबॉल कारकिर्दीच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी साथ दिली. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी मेस्सीचे एजंट आणि सल्लागार म्हणून काम पाहिले. बार्सिलोना, पीएसजी आणि इंटर मियामी यांसारख्या क्लबशी झालेल्या महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये जॉर्ज यांची निर्णायक भूमिका होती. त्यांच्या निधनानंतर न्यूवेल्स ओल्ड बॉईज क्लबने श्रद्धांजली म्हणून आपला ध्वज अर्ध्यावर उतरवला.

मेस्सीच्या बालपणापासूनच जॉर्ज यांनी त्याच्या प्रतिभेला दिशा देण्याचे काम केले. अर्जेंटिनातील रोझारियो येथे स्टील कारखान्यात काम करणाऱ्या जॉर्ज यांनी सुरुवातीच्या काळात स्थानिक क्लबमध्ये मेस्सीला प्रशिक्षणही दिले. पुढे मेस्सीला वाढीच्या संप्रेरकाची कमतरता असल्याचे निदान झाले. उपचारांचा खर्च कुटुंबासाठी मोठे आव्हान ठरत असताना जॉर्ज यांनी १३ वर्षांच्या मेस्सीला बार्सिलोनामध्ये नेले. त्यानंतर मेस्सीची ला मासिया अकादमीत निवड झाली आणि क्लबने त्याच्या उपचारांचा खर्चही उचलला. यानंतर मेस्सीच्या कारकिर्दीतील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात जॉर्ज त्याच्या पाठीशी उभे राहिले. बार्सिलोनासोबतच्या करारांपासून ते २०२१ मध्ये क्लब सोडण्याच्या प्रक्रियेपर्यंत त्यांनी महत्त्वाच्या वाटाघाटी हाताळल्या. त्यानंतर मेस्सीच्या पीएसजी आणि इंटर मियामीमधील प्रवेशातही जॉर्ज यांची भूमिका राहिली.
२०२३ मध्ये मेस्सीने इंटर मियामीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जॉर्ज यांनी बार्सिलोना अध्यक्ष जोन लापोर्टा यांना त्याबाबत माहिती दिली होती.जॉर्ज यांच्या प्रकृतीबाबत जूनमध्ये मेस्सी कुटुंबीयांनी माहिती दिली होती. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यांच्या आरोग्याबाबत अफवा पसरवू नयेत आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, असे आवाहनही करण्यात आले होते. २०२६ च्या फिफा विश्वचषकादरम्यानही जॉर्ज यांच्या प्रकृतीचा विषय चर्चेत आला होता. अल्जेरियाविरुद्ध गोल केल्यानंतर मेस्सी भावूक झाला होता. त्या वेळी गेल्या काही दिवसांचा काळ आपल्यासाठी कठीण असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी जॉर्ज यांच्या आजारपणाची पुष्टी केली होती.दरम्यान, २०१६ मध्ये लिओनेल मेस्सी आणि जॉर्ज मेस्सी यांना स्पॅनिश न्यायालयाने करचुकवेगिरीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. मात्र, दोघांनाही दोन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली होती. मेस्सीला फुटबॉलच्या विश्वात घडवताना आयुष्याची दोन दशके सावलीसारखी साथ देणाऱ्या जॉर्ज मेस्सी यांच्या निधनाने त्याच्या कुटुंबासह अर्जेंटिनाच्या फुटबॉलविश्वावरही शोककळा पसरली आहे.