मुंबई
mrunal thakur अभिनेत्री मृणाल ठाकुर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे नाव भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जायसवालसोबत जोडले गेले. मृणालचे नाव यापूर्वीही अनेक कलाकारांशी जोडले गेले आहे. मात्र, यशस्वी जायसवालसोबत तिच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर अफवांना उधाण आले. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एका कॅफेमध्ये मृणाल आणि यशस्वी एकत्र दिसल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली. दोघेही कॅफेमधून बाहेर पडताना दिसल्याचे सांगत सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या नात्याबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली. काहींनी तर दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचा दावाही केला.
मात्र, या चर्चांना आता स्वतः मृणाल ठाकुरने पूर्णविराम दिला आहे. यशस्वी जायसवालसोबत नाव जोडले गेल्याच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना मृणालने सोशल मीडियावर संतप्त शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. तिने लिहिले, ‘भाई शांत हो जाओ, मुझे दिखाओ कि हम एक साथ कहां थे? कैसे यार आप लोग इतने पढ़े-लिखे लोग ऐसी अफवाहों को सच मानने लगते हैं? देश में क्या कुछ नहीं हो रहा है। जैन जी से कुछ सीखिए और जो सही मुद्दे हैं, उन पर वीडियोज बनाईये। इससे और ज्यादा व्यूज मिलेंगे।’ मृणालच्या या प्रतिक्रियेनंतर ती आणि यशस्वी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मृणाल ठाकुरचे नाव यापूर्वी अभिनेता धनुषसोबतही जोडले गेले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये ‘सन ऑफ सरदार २’च्या प्रीमियरदरम्यान मृणाल आणि धनुष एकमेकांना अतिशय आपुलकीने भेटताना दिसले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, मृणालने या दाव्यांना स्पष्टपणे नकार दिला. या अफवा नेमक्या कुठून सुरू झाल्या, याची आपल्यालाच कल्पना नसल्याचे तिने म्हटले होते. धनुषसोबतचे तिचे नाते केवळ व्यावसायिक असल्याचे मृणालने अनेकदा स्पष्ट केले आहे. यापूर्वी तिचे नाव क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि रॅपर बादशाह यांच्यासोबतही जोडले गेले आहे.
मात्र, इतर नावांच्या तुलनेत लेखक शरद चंद्र त्रिपाठीसोबतचे मृणालचे नाते केवळ इंटरनेटवरील अफवा नव्हते. मृणाल एका काळात शरदला डेट करत होती. दोघांनी ‘नच बलिए ७’ या कार्यक्रमातही एकत्र सहभाग घेतला होता. त्यावेळी आपल्या नात्याबद्दल बोलताना दोघांनीही कुटुंबीय आपल्याला स्वीकारतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि अखेर दोघांनीही आपापल्या वाटा वेगळ्या केल्या.
दरम्यान, मृणाल ठाकुर mrunal thakur अलीकडेच डीपफेक प्रकरणावरूनही चर्चेत आली होती. तिच्या फोटो आणि आवाजाशी छेडछाड करून डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात तिने कठोर भूमिका घेतली होती. अशा प्रकारे तिच्या फोटो, व्हिडिओ किंवा आवाजाचा गैरवापर केल्यास तो अजिबात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तिने दिला होता. तसेच, अशा प्रकारच्या गैरवापर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी असल्याचेही अभिनेत्रीने स्पष्ट केले होते.