मुंबई
child swallows लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये लपलेला एक गंभीर धोका मुंबईतील धक्कादायक घटनेतून समोर आला आहे. खेळण्यात असलेले दोन छोटे निओडिमियम चुंबक एका दोन वर्षांच्या चिमुकल्याने चुकून गिळल्याने त्याच्या आतड्यांना गंभीर इजा झाली. या चुंबकांमुळे आतड्यांना दोन ठिकाणी छिद्रे पडली आणि पोटात पू जमा झाला. अखेर तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चिमुकल्याचे प्राण वाचवले.
मुंबईत राहणाऱ्या एका कुटुंबातील दोन वर्षांच्या मुलाला काही काळापासून सतत ताप, पोटात कळा, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. प्रकृती बिघडल्याने पालकांनी त्याला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला डॉक्टरांना पोटाचा संसर्ग किंवा अॅक्यूट अपेंडिसायटिसचा संशय होता. मात्र, शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर या त्रासामागील खरे कारण समोर आले.लॅप्रोस्कोपिक सक्शन उपकरणाला चिमुकल्याच्या पोटातील दोन छोटे निओडिमियम चुंबक घट्ट चिकटले. त्यानंतर मुलाने हे चुंबक चुकून गिळल्याचे स्पष्ट झाले. हे दोन्ही चुंबक एकमेकांना आकर्षित झाल्याने आतड्यांच्या वेगवेगळ्या भागांना एकत्र ओढले गेले आणि त्यामुळे आतड्यांना दोन ठिकाणी गंभीर छिद्रे पडल्याचे आढळून आले. परिणामी, पोटात पू जमा झाला होता.ही बाब समोर आल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत आतड्यांवरील छिद्रांवर उपचार केले आणि अपेंडिक्सही काढण्यात आले. उपचारानंतर चिमुकल्याची प्रकृती सुधारली आणि त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.मुलगा घरी परतल्यानंतर पालकांनी त्याच्या खेळण्यांची तपासणी केली. त्यावेळी खेळण्यांमध्ये अशाच प्रकारचे आणखी अनेक छोटे चुंबक आढळून आले. त्यामुळे खेळण्यांमध्ये असलेले छोटे आणि शक्तिशाली चुंबक लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.
या घटनेमुळे लहान मुलांसाठी खेळणी निवडताना पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेषतः सहज सुटू शकणारे छोटे चुंबक असलेली खेळणी मुलांच्या हातात देताना त्यातून गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे या घटनेने स्पष्ट केले आहे.