पराग मगर
नागपूर
vedic mathematics वेदांमधील गणितीय ज्ञान सूत्रबद्ध करून ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा पद्धतीने मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पुरी पीठाचे शंकराचार्य श्री भारती कृष्ण तीर्थ यांनी नागपुरातील वास्तव्यात केले. १९५० च्या दशकात तेलंगखेडी परिसरातील आश्रमात वास्तव्यास असताना त्यांनी ‘वैदिक गणित’ या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय गणित पद्धतीला जगासमोर नव्याने परिभाषित केले. त्यामुळे नागपूर ही वैदिक गणिताची जन्मभूमीच असल्याचे माहिती प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आणि विद्याभारती तसेच शिक्षा संस्कृती उत्थान न्यासच्या वैदिक गणित विषय समितीचे प्रमुख सदस्य प्रा. डॉ. श्रीराम चौथाईवाले यांनी दिली.
श्री विश्व पुनर्निर्माण संघ आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने भारती कृष्ण विद्या विहार, जगद्गुरू परिसर, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित ‘भारतीय ज्ञान परंपरा (गणित) आणि वैदिक गणित’ या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने डॉ. चौथाईवाले नागपुरात आले होते. यावेळी ‘तरुण भारत’शी विशेष संवाद साधताना त्यांनी वैदिक गणिताच्या उगमाचा नागपूरशी असलेला संबंध उलगडून सांगितला.आज तेलंगखेडीत ज्या ठिकाणी भारती कृष्ण विद्या विहार ही शाळा आहे, तो परिसर १९५२ ते १९६० या काळात शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ यांचा आश्रम होता. याच काळात त्यांनी लिहिलेले वैदिक गणिताचे विविध खंड प्रवासादरम्यान हरवले. ते शोधण्याचा प्रयत्न द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या शिष्यांनी केला; मात्र हस्तलिखिते सापडली नाहीत. त्यानंतर गुरुजींच्या आग्रहावरून शंकराचार्यांनी याच आश्रमात १३ सूत्रे आणि १६ उपसूत्रांच्या माध्यमातून वैदिक गणिताची सुबोध मांडणी केली. ‘वैदिक गणित’ या नावाने प्रकाशित झालेल्या या ग्रंथात भारतीय गणितीय परंपरेतील विविध पद्धती आणि तंत्रांचा सप्रमाण ऊहापोह करण्यात आला आहे.
बेरीज-वजाबाकीपासून भागाकारापर्यंत वेगवान पद्धती
मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती भारतात लागू होण्यापूर्वी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारख्या मूलभूत गणितीय क्रिया अत्यंत वेगाने सोडविण्यासाठी भारतीय गणित तज्ज्ञांनी विविध सूत्रे आणि तंत्रे विकसित केली होती. वैदिक गणितात याच पद्धतींना सूत्रबद्ध आणि शास्त्रशुद्ध स्वरूप देण्यात आल्याचे डॉ. चौथाईवाले यांनी सांगितले.
‘बहुधायन सूत्र’ पायथागोरसपेक्षाही प्राचीन
भारतीय ज्ञानपरंपरेत तत्त्वज्ञान आणि विज्ञानाची मांडणी अनेकदा सूत्रांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दिशा, अंतर आणि भूमितीय गणना यांसाठी आज भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पायथागोरसचे प्रमेय सर्वश्रुत आहे. मात्र पायथागोरसच्या प्रमेयापूर्वीच भारतात ‘बहुधायन सूत्रा’च्या माध्यमातून अचूक अंतर आणि दिशा निश्चित करण्याचे तंत्र अस्तित्वात होते, असे डॉ. चौथाईवाले यांनी सांगितले. वैदिक गणिताच्या ग्रंथातही या सूत्राचा संदर्भ आढळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. गणितातील क्लिष्ट गणना कमी वेळेत सोडविण्यासाठी आज विविध तंत्रे आणि सूत्रे वापरली जातात. यातील अनेक तंत्रांचा उगम वैदिक गणितातील सूत्रांमध्ये असल्याचे चौथाईवाले यांनी सांगितले. मात्र कालांतराने यातील अनेक तंत्रे इतर गणित तज्ज्ञांनी आपल्या नावाने प्रसिद्ध केल्याचेही त्यांनी नमूद केले.
शंकराचार्यांची हस्तलिखिते नागपुरात आजही सुरक्षित
शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ यांनी नागपुरात वास्तव्यास असताना विश्व पुनर्निर्माण संघाची स्थापना केली. संघाने त्यांची हस्तलिखिते आजही जतन करून ठेवली आहेत. ही हस्तलिखिते संपूर्णतः इंग्रजी भाषेत असून ती संस्थेसोबतच नागपूरचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा असल्याचे संघाचे वर्तमान विश्वस्त आणि वैदिक गणिताचे संयोजक श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. संघाद्वारे संचालित भारती कृष्ण विद्या विहारमध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबत वैदिक गणिताचे शिक्षण दिले जात आहे. भविष्यात महाराष्ट्रासह देशभरातील शाळांमध्ये भारतीय गणितीय पद्धतींच्या माध्यमातून गणिताचे अध्ययन अधिक व्यापक व्हावे, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.