नाशिक-पुणे रेल्वेच्या मार्गबदलाविरोधात हजारोंचा एल्गार

समृद्धी महामार्गावर चक्काजाम, तांबे पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
नाशिक
nashik pune railway नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावित मार्गात करण्यात आलेल्या बदलावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. या रेल्वे प्रकल्पाचा मूळ आराखडा बदलून पर्यायी मार्गाचा विचार सुरू असल्याने अहिल्यानगरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये नाराजी आहे. मूळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आज सिन्नर, संगमनेर, अकोले आणि नाशिक परिसरात नागरिक रस्त्यावर उतरले असून, समृद्धी महामार्गावर रास्तारोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

nashik pune railway 
 
सकाळी ९ वाजल्यापासून नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात आंदोलनाला सुरुवात झाली. सिन्नर, संगमनेर, अकोले आणि नाशिकसह सिन्नर-संगमनेर-चाकण परिसरात एकाच वेळी आंदोलन करण्यात आले. हजारो आंदोलक रस्त्यावर उतरल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत मूळ आराखड्यानुसारच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची उभारणी करण्याची मागणी केली.
या आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले. सिन्नर येथील समृद्धी महामार्ग परिसरात सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी चक्काजाम केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना समृद्धी महामार्गावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेतले. सत्यजित तांबे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या कमी फ्रिक्वेन्सी रेडिओ दुर्बिणी समूहाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच कारणामुळे रेल्वे प्रकल्पाच्या मार्गाला विरोध होत असून, मार्गात बदल करणे किंवा काही भाग भूमिगत करण्याच्या शक्यतेचा तांत्रिक अभ्यास सुरू आहे.
या अभ्यासासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत रेल्वे बोर्डाचे विवेक गुप्ता तसेच पुणे आणि नाशिक विभागाचे आयुक्त यांचा समावेश आहे. या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करायचा आहे.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचा पूर्वीचा प्रस्तावित मार्ग पुणे-चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक असा होता. या मूळ मार्गात बदल करण्याचा निर्णय झाल्याने पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा आणि अहिल्यानगर-चाकण या पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले आहे. या पर्यायी मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूळ मार्ग कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवावा, या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-नारायणगाव-राजगुरुनगर-चाकण या मूळ आणि सरळ मार्गानेच व्हावा, अशी मागणी यापूर्वीही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे. या मार्गातील बदलामुळे या भागाच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासावर परिणाम होईल, तसेच शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांच्या हिताला धक्का बसेल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गासह समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला असून, मार्गावर मोठी कोंडी निर्माण झाली आहे. मूळ आराखड्यानुसारच रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, या मागणीवर आंदोलक ठाम असल्याने आता सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.