नागपूर
divorce पुण्यातील मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगारावर नोकरी असलेल्या युवकाचा खापरखेड्यातील एका उच्चशिक्षित युवतीशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. नवदाम्पत्याचा संसार सुरू होण्याच्या काही महिन्यांतच दोघांच्याही आईवडिलांचा संसारात हस्तक्षेप वाढला. दोन्ही कुटुंबीयांच्या दबावात पती-पत्नीत वाद व्हायला लागले. शेवटी पोलिस ठाण्यात तक्रारी आणि तडजोडीनंतर न्यायालयातून दोघांचा घटस्फोट झाला. अशाप्रकारे आईवडिलांच्या अतिहस्तक्षेपामुळे मुलांच्या संसाराची माती झाली.
आशिष हा पुण्यातील एका कंपनीत मोठ्या वेतनावर उच्च पदावर कार्यरत असून त्याची ओळख मॅट्रीमोनी वेबसाईटवरून प्रगती (काल्पनिक नाव) या युवतीशी झाली. उच्चशिक्षित असलेल्या प्रगतीशी आशिषने संपर्क साधला आणि ओळख वाढवली. काही दिवसांतच दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांशी चर्चा करून लग्न करण्याचे ठरविले. दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी केली. २०१९ मध्ये दोघांचेही थाटामाटात लग्न लावून दिले. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नात वारेमाप खर्च करीत धूमधडाक्यात विवाह सोहळा संपन्न केला. लग्नानंतर काही दिवस नागपुरात राहिल्यानंतर दोघांनीही पुण्यात फ्लॅट घेऊन आपला संसार थाटला. प्रगती घरी राहून पुढील भविष्याचा विचार करून अभ्यासाला लागली. दोघांचाही सुरळीत संसार सुरू होता. दिवसागणिक दोघांतील प्रेम वाढत गेले. दोघांनीही काही दिवसांतच संसारवेलीवर फूल उमलण्याचे स्वप्न रंगवले. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. आशिषच्या आईची नवदाम्पत्याच्या संसारात लुडबूड सुरू झाली. प्रगतीने संसारासाठी सर्व काही सहन केले. काही दिवस असेच लोटले. मात्र, ती मन हलके करण्याच्या उद्देशाने आपल्या आईकडे घरातील गोष्टी सांगत गेली. त्यातून सुव्यवस्थितपणे रुळावर असलेल्या संसाराला ग्रहण लागले. एकमेकांच्या आईवडिलांचा अतिहस्तक्षेप वाढला. त्यातून पती-पत्नीत खटके उडायला लागले.
आईने दिलेला सल्ला अंतिम मानून आशिष आपल्या संसारात त्याप्रमाणे वागत होता तर प्रगतीसुद्धा आपल्या आईकडून सल्ले घ्यायला लागली. धार्मिक सण-उत्सवादरम्यान कपडे आणि पूजा कशी मांडायची, यावरूनही सल्ले देण्यात येत होते. आशिष आपल्या आईचे ऐकत होता तर प्रगतीसुद्धा आपल्या आईचा आदेश शिरसावंद्य मानत होती. आई आणि सासूच्या सल्ल्यांमुळे दोघांच्या संसाराचे ‘सँडविच’ झाले.
प्रकरण पोहचले न्यायालयात
आशिष आणि प्रगतीमधील वाद विकोपाला गेले. त्यानंतर प्रगती शिक्षण आणि पतीला सोडून थेट माहेरी आली. काही महिन्यांनंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आशिष व कुटुंबीयांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळासह गुन्हे दाखल केले. प्रकरण न्यायालयात गेले. दोघेही माघार घेण्यास तयार नव्हते. दोघांच्याही मातोश्री न्यायालयात उपस्थित राहायला लागल्या.
...अखेर सुखी संसाराचा चुराडा
आशिष आणि प्रगती यांनी कौटुंबिक ताणतणावाला कंटाळून दोघांच्याही कुटुंबीयांच्या सल्ल्याने आपसात तडजोड करून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ॲड. राजू कडू आणि ॲड. प्रीती कडू यांच्या मार्फत घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात सादर केला. न्यायाधीशांनी दोघांनाही संसार टिकविण्याबाबत शेवटची संधी दिली. मात्र, दोघांनीही संसारातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.