अनिल कांबळे
नागपूर
petrol pump dealership scam पेट्रोल पंपची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल २८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. डीलरशिप मिळेल या विश्वासाने संबंधित व्यक्तीने आरोपीच्या खात्यात वेळोवेळी रक्कम जमा केली. मात्र, अनेक महिने उलटूनही डीलरशिप मिळाली नाही आणि पैसेही परत करण्यात आले नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आशीष रमेश कटकमवार (रा. शिंदे लेआऊट, भद्रावती, चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी स्वप्नील विलास असरकर (४१, रा. सुदाम रोड, इतवारी) हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तक्रारीनुसार, आशीष याने स्वप्नील यांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पेट्रोल पंपाची डीलरशिप मिळवून देण्याचे आश्वासन दिले. व्यवसायाची चांगली संधी मिळेल, या विश्वासाने स्वप्नील यांनी आरोपीच्या खात्यात १७ जानेवारी २०२५ पासून वेगवेगळ्या तारखांना अनेक हप्त्यांमध्ये एकूण २८ लाख रुपये जमा केले. रक्कम मिळाल्यानंतर आरोपीने डीलरशिपची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत लवकरच पेट्रोल पंपासंदर्भातील काम पुढे जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे स्वप्नील हे डीलरशिप मिळण्याच्या प्रतीक्षेत राहिले. मात्र, अनेक महिने उलटूनही डीलरशिप मिळाली नाही. तसेच दिलेली रक्कमही परत करण्यात आली नाही.
पैसे परत मागितले असता टाळाटाळ
डीलरशिप मिळण्याबाबत ठोस प्रगती होत नसल्याने स्वप्नील यांनी आरोपीकडे डीलरशिप मिळवून द्यावी किंवा २८ लाख रुपये परत करावेत, अशी मागणी केली. मात्र, आरोपीकडून कथितरीत्या टाळाटाळ सुरूच राहिली. डीलरशिपही मिळाली नाही आणि रक्कमही परत न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्वप्नील यांना समजले. त्यांनी तहसील पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत गुन्हा दाखल करण्यास पुरेसे आधार मिळाल्यानंतर पोलिसांनी ६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी आशीष कटकमवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१४, ३१६ आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.