नवी दिल्ली,
sai out sarfaraz in श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दुखापतीमुळे फलंदाज साई सुदर्शन या मालिकेला मुकण्याची शक्यता असून, त्याच्या जागी सरफराज खानला संघात स्थान मिळू शकते. बऱ्याच काळापासून भारतीय संघापासून दूर असलेल्या सरफराजसाठी ही संधी पुनरागमनाचे दार उघडणारी ठरू शकते.
एएनआयच्या वृत्तानुसार, सुदर्शनच्या दुखापतीचा विचार करता त्याच्या जागी सरफराज खानचा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे. मात्र, संघातील या बदलावर अंतिम शिक्कामोर्तब बीसीसीआयकडूनच केले जाणार आहे. बीसीसीआयमधील एका सूत्राने याबाबत माहिती दिली आहे.
साई सुदर्शन सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव सुरू केला असला तरी १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. सुदर्शन भारतीय संघासोबत श्रीलंकेला गेलेला नाही. तसेच ८ ऑगस्टपासून कोलंबो येथे श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध सुरू झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यातही तो सहभागी झालेला नाही.
भारतीय संघासमोरील दुखापतींचे संकट सुदर्शनपुरते मर्यादित राहिलेले नाही. कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या हाताच्या अनामिकेलाही सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय पथकाची देखरेख सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गिल सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे. गिल पहिल्या कसोटीसाठी तंदुरुस्त होणार की नाही, यावर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळेही भारताला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्याने श्रीलंका मालिकेत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. पुरुष निवड समितीने त्याच्या जागी आकिब नबीला संघात घेतले आहे. हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हे देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नाही, तर आकाश दीप पाठीच्या स्ट्रेस रिॲक्शनमधून सावरत असल्याने सध्या संघापासून दूर आहे.
श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका भारतासाठी केवळ विजयाच्या दृष्टीनेच नव्हे, तर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ चक्रातील स्थान सुधारण्यासाठीही महत्त्वाची आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत नऊ सामने खेळताना चार विजय आणि चार पराभव नोंदवले असून, संघाची गुणांची टक्केवारी ४८.१५० आहे.
त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताला मजबूत सुरुवात करण्याचे आव्हान असेल. मात्र, एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतीच्या विळख्यात सापडत असल्याने अंतिम संघरचना निवडणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. सरफराज खानला संधी मिळाल्यास त्याच्यासाठीही ही आपली क्षमता सिद्ध करण्याची महत्त्वाची संधी असेल.