चालकाने अडवला समृद्धी महामार्ग

आरटीओच्या कारवाईविराेधात मुंबई लेनवर आडवा केला कंटेनर, वाहतूक तासभर ठप्प

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
वर्धा
Samruddhi Mahamarg समृद्धी महामार्गावर एआरटीओच्या कारवाईवर नाराज झालेल्या एका कंटेनर चालकाने मुंबईकडे जाणार्या लेनवर ट्रक आडवा लावला. रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई लेनवरील वाहतूक एक तास पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे येळाकेळी इंटरचेंजपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कंटेनर बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.

samrudhhi 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एच. आर. ५५ बी. ए. ८५४४ क्रमांकाचा कंटेनर नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होता. सावंगी मेघे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर परिसरातील एका पेट्रोल पंपजवळ एआरटीओच्या पथकाने कंटेनर थांबवून चालकाकडे वाहनाची कागदपत्रे मागितली. कागदपत्रांची तपासणी केली असता काही त्रुटी आढळून आल्याने चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. एआरटीओच्या पथकाने वाहनाची कागदपत्रे आपल्यासोबत नेल्याचे सांगण्यात येते. ही कारवाई सकाळच्या सुमारास झाली होती. त्यानंतर चालक बरेच तास कंटेनर घेऊन त्याच ठिकाणी थांबला होता. मात्र, त्याला वाहनाची कागदपत्रे परत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त कंटेनर चालकाने दुपारी साडेचारच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणार्या लेनवर कंटेनर आडवा लावला.
कंटेनर मार्गात आडवा असल्याने मागून येणारी छोटी-मोठी वाहने थांबू लागली आणि काही वेळातच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कंटेनर चालकाने आपली समस्या अन्य वाहन चालकांना सांगितली. त्यांनीही त्याला पाठिंबा दिल्याने मुंबईच्या दिशेने जाणार्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाहनांच्या रांगा येळाकेली इंटरचेंजपर्यंत पोहोचल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि सावंगी (मेघे) पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत कंटेनर चालक तेथून पसार झाला होता. पोलिसांनी कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना एक तास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. वृत्तलिहिस्तोवर कंटेनर चालकाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू होती.