देहू
sant tukaram maharaj palkhi ‘सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया॥’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा भाव प्रत्यक्ष अनुभवत पंढरीच्या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठलभक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. तब्बल ३५ दिवसांच्या वारीनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीतील ३४१ वा पालखी सोहळा रविवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूत परतला. देहूकरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात उत्साहाने पालखीचे स्वागत केले.
पहाटे नित्यपूजा झाल्यानंतर पिंपरीगाव येथील श्री भैरवनाथ मंदिरातून वारकरी, दिंडीकरी आणि भाविकांसह पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला. पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोडमार्गे पालखी चिंचोली येथील शनी मंदिराजवळ पोहोचली. येथे पालखीचा विसावा झाला. यावेळी अभंग आरती करण्यात आली.
दुपारी पालखी देहूच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल होताच ग्रामस्थ आणि भाविकांनी फुलांचा वर्षाव करून तिचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सुवासिनींनी पालखी रथाच्या बैलजोडीचे औक्षण केले. वेशीजवळ रामचंद्र तुपे कुटुंबीयांच्या वतीने पालखीला दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला.या वेळी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे, ह.भ.प. उमेश मोरे, विश्वस्त ह.भ.प. गणेश मोरे, ह.भ.प. वैभव मोरे आणि ह.भ.प. दिलीप मोरे यांच्यासह माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, देहू नगरपंचायतीचे नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात खांदेकऱ्यांनी पालखी रथातून पालखी खांद्यावर घेतली. पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हनुमान मंदिरासमोर संतपर अभंग झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी आरती करण्यात आली.
मुख्य मंदिरात पालखीचे sant tukaram maharaj palkhi आगमन झाल्यानंतर चांदीची अब्दागिरी, गरुड टक्के आणि रेशमी छत्रासह पालखीची देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरती झाली. यावेळी वारकऱ्यांनी ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष केला. तुतारी, शंख, नगारा आणि ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला.यानंतर भजनी मंडपात संस्थानच्या वतीने सेवेकरी, मानकरी आणि दिंडीचालकांचा नारळ-प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित भाविकांना एकादशीचा फराळ आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान सेवा बजावणारे पोलीस, गृहरक्षक दल, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय पथक यांचेही संस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.
३५ दिवसांच्या भक्तिमय वारीनंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूत परतल्याने देहू नगरीत भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वारकऱ्यांच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर विठ्ठलनामात रंगून गेला.