चित्रपट दिग्दर्शक शकील नूरानी यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी अटक

१२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
मुंबई
shakil noorani चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउच आणि लैंगिक अत्याचाराच्या अनुभवांबाबत अभिनेत्रींकडून वेळोवेळी धक्कादायक खुलासे केले जात असतानाच मनोरंजन क्षेत्रातून आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. ‘बडे दिलवाला’ (१९९९) आणि ‘जोरू का गुलाम’ (२०००) यांसारख्या चर्चित हिंदी चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले ज्येष्ठ दिग्दर्शक शकील नूरानी (७३) यांना मुंबईतील मालवणी पोलिसांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक केली आहे. एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने नूरानी यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप करत मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. अटकेनंतर नूरानी यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 

shakil noorani arrested over sexual assault allegations, sent to police custody till august 12 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी चित्रपटाच्या प्रकल्पावर चर्चा करण्याच्या बहाण्याने नूरानी यांनी ३३ वर्षीय अभिनेत्रीला मालवणी येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावले होते. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेला कथितरीत्या नशेचे पदार्थ देण्यात आल्याचा तसेच नंतर एका कथित व्हिडीओच्या माध्यमातून तिला धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी मालवणी पोलिसांनी शकील नूरानी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(२)(M), १२३, ३५१(२) आणि ८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नूरानी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मालवणी पोलिसांनी त्यांना बोरीवली हॉलिडे कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून परिचित आहेत. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विष्णु देवा’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे दिलवाला’ या चित्रपटातून त्यांनी लेखन क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांनीच केली होती. गोविंदा आणि ट्विंकल खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जोरू का गुलाम’ या चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते. वर्ष २००० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट ठरला होता. याशिवाय २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब: द अॅसिड ऑफ लव्ह’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन नूरानी यांनी केले होते.दरम्यान, अभिनेत्रीने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेत आरोपांची सत्यता निश्चित होणे बाकी आहे.