पावसाचा कमबॅक! १३ ऑगस्टपासून जोरदार सरी

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Spells of rain starting from August 13 महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ ऑगस्टपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे.बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पुन्हा पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 
 
Spells of rain starting from August 13
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने ८ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, उत्तर कोकण तसेच दक्षिण कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ९ ते १२ ऑगस्टदरम्यान कोकणातील पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
 
 
 
जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागांमध्ये पाणी साचणे, स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. जुन्या किंवा कमकुवत संरचनांनाही धोका निर्माण होऊ शकतो. घाट परिसरात मुसळधार पाऊस झाल्यास भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. दरम्यान, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा पाऊस कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, राज्यात आतापर्यंत ६३७.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत राज्यात सरासरी ६२२.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. म्हणजेच यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा २ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने उघडीप घेतली असून विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हिंगोलीमध्ये सर्वात कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.