स्वरा भास्करला डेंग्यू; रुग्णालयातील फोटो शेअर करत दिले हेल्थ अपडेट

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
मुंबई
swara bhasker बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करची प्रकृती अचानक बिघडली असून तिला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वरा भास्करने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली. अचानक समोर आलेल्या या वृत्तामुळे तिचे चाहते चिंतेत असून, सोशल मीडियावर तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, ‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री अविका गौरलाही डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे.
 

swara bhasker hospitalised with dengue, fans concerned as avika gor also battles the infection 
स्वरा भास्करने इन्स्टाग्रामवर रुग्णालयातील बेडवर असतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने आपल्या प्रकृतीबाबत आश्चर्य व्यक्त करणारा छोटासा संदेशही लिहिला. ‘सगळं इतक्या वेगाने झालं. डेंग्यू झाला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं,’ अशा आशयाचा संदेश तिने दिला. स्वरा भास्करच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना तिला डेंग्यू झाल्याची माहिती मिळाली. मात्र, या आजाराचे निदान नेमके कधी झाले किंवा ती किती दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे, याबाबत तिने कोणतीही माहिती दिलेली नाही.स्वरा भास्करच्या आधी ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौरलाही डेंग्यू झाल्याची आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अविकाचा पती मिलिंद चंदवानीने अलीकडेच तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. आजाराचे योग्य निदान होण्यापूर्वी अविकाला सलग पाच दिवस तीव्र ताप होता, असे मिलिंदने सांगितले होते. त्यानंतर तपासणीत तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती साथ देत नसतानाही अविका सातत्याने काम करत असल्याचे मिलिंदने सांगितले. तीव्र ताप असतानाही तिने एका प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर कामानिमित्त ती दिल्लीलाही गेली होती. मात्र, मुंबईत परतल्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत डेंग्यूचे निदान झाले. मिलिंदने तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आपल्या प्रकृतीमुळे निर्मात्यांचे किंवा मेकर्सचे नुकसान होऊ नये, अशी अविकाची इच्छा होती. त्यानंतर तिने रुग्णालयातील बेडवरून स्वतःचा फोटोही शेअर केला.
स्वरा भास्कर आणि अविका गौर या दोन्ही अभिनेत्री रुग्णालयात दाखल असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. बदलते हवामान आणि डासांचा वाढता उपद्रव यामुळे डेंग्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही या पार्श्वभूमीवर दिसून येते. दोन्ही अभिनेत्रींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे की त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, याबाबत अद्याप कोणतेही नवीन अपडेट समोर आलेले नाही.
दरम्यान, स्वरा भास्कर अखेर ‘पती पत्नी और पंगा’ या टीव्ही शोमध्ये तिचा पती फहाद अहमदसोबत दिसली होती. आता स्वरा आणि अविका या दोन्ही अभिनेत्रींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.