मुंबई
tvf ente ‘कोटा फॅक्टरी’, ‘पंचायत’, ‘सपने वर्सेस एवरीवन’ आणि ‘गुल्लक’सारख्या गाजलेल्या मालिकांनंतर द वायरल फीवर अर्थात TVFने आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. वेगळ्या धाटणीच्या कथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रॉडक्शन हाऊसने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची घोषणा केली असून, त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव ‘बयांगी: पलायची नाही, तालायची’ असे आहे. निर्मात्यांनी एका गूढ पोस्टरद्वारे या चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरमध्ये एका नारळाशेजारी दिवा ठेवलेला दिसत आहे. हा चित्रपट हॉरर प्रकारातील असून कोकणातील सर्वाधिक भयावह लोककथांपासून प्रेरित आहे. विशेष म्हणजे, यात अलौकिक घटनांसोबत विनोदाचा रंजक मिलाफ पाहायला मिळणार आहे.

TVFने आपल्या वेगळ्या आणि आशयघन कथांमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे पहिले पाऊलही काहीसे हटके असणार आहे. ‘बयांगी: पलायची नाही, तालायची’च्या माध्यमातून लोककथांच्या गूढ आणि रहस्यमय विश्वाला आजच्या काळातील ह्युमरस ट्रीटमेंटसोबत जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट असून त्याचा जॉनर हेच त्याचे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. सुपरनॅचरल लोककथेच्या पार्श्वभूमीवर कथा पुढे सरकणार असली, तरी तिची मांडणी गंभीर न ठेवता मनोरंजन आणि विनोदाने परिपूर्ण करण्यात आली आहे.
‘बयांगी’ची कथा कोकणातील धुक्याने वेढलेल्या गावांच्या पार्श्वभूमीवर घडते. या कथेत एक बयांगी आणि चार अविवाहित तरुण केंद्रस्थानी आहेत. या चौघांना आपले आयुष्य ऐषआरामात जगण्यासाठी एक ‘चीट कोड’ सापडल्याचे वाटते. मात्र, बयांगीची एक ठरावीक वैधता असते आणि निश्चित कालावधीत ती परत करणे आवश्यक असल्याचे त्यांना कळते. त्यानंतर त्यांचा आनंद हळूहळू एका भयानक स्वप्नात बदलतो. बयांगी वेळेत परत केली नाही, तर तिची विनाशकारी शक्ती बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे चौघांसमोर मोठे संकट उभे राहते.
आपल्या मित्राला वाचवण्यासाठी tvf ente हे चारही जण एकत्र येऊन बयांगीवर मात करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या प्रवासात त्यांना हळूहळू जाणवते की त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या इच्छेची एक किंमत आहे. त्यामुळे लोककथा, अलौकिक शक्ती, भीती आणि विनोद यांचा अनोखा संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
द वायरल फीवर अर्थात TVFची निर्मिती असलेल्या ‘बयांगी: पलायची नाही, तालायची’चे दिग्दर्शन अभय राऊत यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘गुल्लक’च्या पाचव्या सीझनचेही दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अमेय वाघ, हार्दिक जोशी, मनमीत पेम आणि अविनाश खेडेकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
गेल्या काही वर्षांत TVFने ‘गुल्लक’ आणि ‘सपने वर्सेस एवरीवन’सह अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्यातील ‘पंचायत’ ही TVFच्या सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचे आतापर्यंत चार सीझन प्रदर्शित झाले असून सर्वच सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘पंचायत सीझन ५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. अशा वेळी TVFचा पहिलाच मराठी चित्रपट ‘बयांगी: पलायची नाही, तालायची’ प्रेक्षकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतो, याकडे आता लक्ष लागले आहे.