यूपीएससीत हिंदीतून IAS-IPS होणाऱ्यांची संख्या घटली

२०२४ मध्ये केवळ पाच उमेदवारांची शिफारस

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली
upsc hindi केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांचा माध्यम म्हणून वापर करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत असली, तरी हिंदी-मैथिली माध्यमातून परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) पदांसाठी शिफारस होणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाल्याचे समोर आले आहे. २०२४ मध्ये अशा केवळ पाच उमेदवारांची IAS आणि IPS पदांसाठी शिफारस झाली, तर २०२२ मध्ये ही संख्या २७ पर्यंत पोहोचली होती. केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.
 

upsc hindi medium candidates: ias-ips recommendations fall sharply to just 5 in 2024 
राज्यसभेत सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, हिंदी-मैथिली माध्यमातून नागरी सेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपैकी IAS आणि IPS पदांसाठी शिफारस झालेल्यांची संख्या २०२१ मध्ये १०, २०२२ मध्ये २७, २०२३ मध्ये १४ आणि २०२४ मध्ये ४ होती. म्हणजेच २०२२ मध्ये २७ उमेदवारांसह ही संख्या चार वर्षांतील सर्वाधिक होती. त्यानंतर या संख्येत सातत्याने घट झाली आणि २०२४ मध्ये ती ५ पर्यंत पोहोचल्याचेही दिलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, हिंदीसह संविधानाच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट असलेल्या इतर भाषांमध्ये नागरी सेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्याही सरकारने राज्यसभेत जाहीर केली. या आकडेवारीत २०२४ मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये अशा भाषांमधून मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या ५३८ होती. २०२२ मध्ये ती वाढून ५८७, तर २०२३ मध्ये ५९९ झाली. मात्र, २०२४ मध्ये या उमेदवारांची संख्या तब्बल १,१३३ वर पोहोचली.
मात्र, या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांची संख्या त्याच प्रमाणात वाढलेली नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये २६ उमेदवार मुख्य परीक्षेत पात्र ठरले होते. २०२२ मध्ये ही संख्या ७१, २०२३ मध्ये ५७, तर २०२४ मध्ये ५० इतकी होती.
राज्यसभेतील उत्तरात upsc hindi बिहारमधून नागरी सेवा परीक्षेसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची वर्षनिहाय आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार २०२१ मध्ये बिहारमधून ५४ उमेदवारांची शिफारस झाली होती. २०१९ मध्ये ही संख्या वाढून ६३ झाली, तर २०२३ मध्ये ती ८२ वर पोहोचली. मात्र, २०२४ मध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांची संख्या घटून ७२ झाली.एकूणच, केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधून यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, हिंदी-मैथिली माध्यमातून परीक्षा देऊन IAS आणि IPS पदांसाठी शिफारस होणाऱ्या उमेदवारांची संख्या २०२२ मधील २७ वरून २०२४ मध्ये केवळ ५ पर्यंत घसरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.