अफवांना धक्का?मोजतबा खामेनेईचा व्हिडिओ समोर

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
तेहरान,
Video of Mojtaba Khamenei surfaces इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या मृत्यूच्या अफवा, गंभीर जखमी झाल्याचे दावे आणि ते इराणमध्येच नसल्याच्या बातम्यांदरम्यान त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. इराणी वृत्तसंस्थाने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये मोजतबा खामेनेई नागरिकांमध्ये जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. सर्वोच्च नेता बनल्यानंतर मोजतबा खामेनेई यांचा सार्वजनिकरित्या समोर आलेला हा पहिलाच व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.
 
 

Video of Mojtaba Khamenei surfaces 
 
 
मात्र, हा व्हिडिओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. गेल्या काही दिवसांत मोजतबा खामेनेई यांच्या आरोग्याविषयी वेगवेगळे दावे करण्यात आले होते. इस्रायली चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त दिले होते. त्यांच्यावर मृत्यूचे संकट असल्याचाही दावा करण्यात आला होता. आता नव्या व्हिडिओमुळे या दाव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, त्यांच्या सध्याच्या आरोग्यस्थितीबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 
 
 
दरम्यान, सौदी माध्यमने एका इस्रायली सुरक्षा सूत्राच्या हवाल्याने मोजतबा खामेनेई सध्या इराणमध्ये नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या नावाने प्रसिद्ध होणारे अधिकृत संदेश नवीन आयआरजीसी प्रमुख अहमद वाहिदी आणि इतर वरिष्ठ अधिकारी तयार करत असल्याचेही या सूत्राने म्हटले आहे. सर्वोच्च नेता झाल्यापासून मोजतबा खामेनेईसार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. त्यांनी अद्याप कोणतेही सार्वजनिक भाषण केलेले नाही. सरकारी माध्यमांमध्ये त्यांच्या नावाने केवळ काही लिखित संदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मोजतबा यांचे वडील आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतरही त्यांनी कोणत्याही सरकारी मंत्र्यांची भेट घेतल्याचे समोर आलेले नाही. त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीलाही ते उपस्थित नव्हते, अशी माहिती इराणी माध्यमांनी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष मसूद पाझेश्कियान यांनीही सर्वोच्च नेत्याशी थेट संपर्क साधणे कठीण असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, इराणच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी मोजतबा यांच्या प्रकृतीबाबत करण्यात आलेले गंभीर दुखापतीचे दावे फेटाळून लावले आहेत.