डम्पर आणि पोकलँड गावकऱ्यांनी रोखले

वन तलावातून गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक, थार ग्रा.पं.च्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईनही फुटली

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
तळेगाव (श्या. पं.)
unauthorized-transport talegaon आष्टी उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन ८ ऑगस्ट रोजी दुपारी पार पडले. त्याच रात्री थार येथील वन तलावातून विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक सुरू होती. रात्री ८ वाजताच्या सुमारास मुरूम भरलेले डम्पर ये-जा करत असल्याचे निदर्शनास येताच थारचे उपसरपंच संदीप परतेती यांनी ग्रा.पं.च्या माजी सदस्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. मुरूम वाहतुकीमुळे पाणी पुरवठ्याची पाईपलाईनही फुटली. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन डम्पर ताब्यात घेतले तर गावकऱ्यांनी पोकलँड गावातच थांबवून ठेवला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
talegaon
 
unauthorized-transport talegaon थार येथील वन तलावातून विनापरवानगी डम्परच्या सहाय्याने गौण खनिजाचे उत्खनन सुरू होते. जवळपास १० डम्परच्या माध्यमातून वाहतूक सुरू होती. उपसा सिंचन योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून थार वन तलाव परिसरातून मुरूम काढून वाहतूक केली जात होती. गावकऱ्यांनी उत्खननाला विरोध करताच वाहतूक थांबविण्यात आली. डम्पर ग्रा. पं. कार्यालयातून जात असताना थार ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनही फुटली. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली. उपसरपंच संदीप परतेती, प्रफुल्ल उईके, मंगेश उईके यांच्यासह ग्रामस्थांनी डम्पर रोखून संबंधित अधिकार्यांना फोन करून कारवाईची मागणी केली. मात्र, काही अधिकाऱ्यांकडून हे आमचे काम नाही, अशी भूमिका घेतली. तलाठी बंबलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
unauthorized-transport talegaon अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली. आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मध्यस्थी केली. त्यानंतर एम. एच. १२ वाय. क्यू. १८३६ आणि एम. एच. १२ वाय. क्यू. १८३७ असे दोन डम्पर आणि एस. वाय. २१५ सी. ९ एल. सी. क्रमांकाचा पोकलँड ताब्यात घेतले. पोकलँड थार गावातच थांबवून ठेवण्यात आला. या प्रकारामुळे सुमारे दोन तास गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. विनापरवानगी उत्खनन व वाहतूक करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, नियमानुसार दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपसरपंच संदीप परतेती यांनी केली आहे.