अजिंक्य रहाणे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट

निवृत्तीनंतर नव्या इनिंगची चाहूल, क्रिकेट अकादमीबाबत चर्चा?

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई
ajinkya rahane मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देत असतानाच आता रहाणेच्या नव्या इनिंगची चाहूल लागली आहे. निवृत्तीच्या घोषणेनंतर काही दिवसांतच त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
 

ajinkya rahane 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अजिंक्य रहाणेने सदिच्छा भेट घेतली. या भेटीमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, रहाणेच्या क्रिकेटशी संबंधित आगामी योजनांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. क्रिकेटला निरोप देताना रहाणे भावुक झाला होता. ही घोषणा करताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. दीर्घ क्रिकेट कारकिर्दीनंतर त्याने आपल्या खेळाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, अजिंक्य रहाणेला राज्य शासनाकडून मुंबईतील वांद्रे परिसरात क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी भूखंड मंजूर करण्यात आला आहे. सुमारे २ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडावर रहाणेला जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारायची आहे. युवा क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही अकादमी महत्त्वाची ठरू शकते.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील भेटीकडे पाहिले जात आहे. मात्र, भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली किंवा रहाणेच्या आगामी योजनांबाबत कोणता निर्णय झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे रहाणेच्या निवृत्तीनंतरच्या नव्या इनिंगमध्ये क्रिकेट अकादमीची भूमिका किती महत्त्वाची ठरणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.