कॅलिफोर्निया,
Apple's leadership with John Ternus जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपलमध्ये १ सप्टेंबर २०२६पासून मोठा नेतृत्वबदल झाला आहे. जवळपास १५ वर्षे कंपनीचे सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर टिम कुक यांनी पद सोडले असून, त्यांच्या जागी जॉन टर्नस यांनी सीईओपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. कुक आता अॅपलचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा बदल दीर्घकालीन उत्तराधिकार नियोजनाचा भाग आहे. ऑगस्ट २०११मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्यानंतर टिम कुक यांनी अॅपलचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीचे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक झाले, तर अॅपलने ३ अब्ज आयफोन शिपमेंट्सचा टप्पा पार केला.

याच काळात अॅपल म्युझिक, अॅपल टीव्ही+, आयक्लाउड यांसारख्या सेवांचा विस्तार झाला आणि अॅपल वॉच व एअरपॉड्ससारख्या उत्पादनांनीही कंपनीच्या व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावली. पुरवठा साखळी मजबूत करण्यासोबतच चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतासह इतर देशांमध्ये उत्पादन वाढवण्यावरही भर देण्यात आला. मॅकचे अॅपल सिलिकॉन चिप्सकडे झालेले संक्रमण हेही कुक यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे तांत्रिक पाऊल मानले जाते. आता जॉन टर्नस यांच्या नेतृत्वाखाली अॅपलच्या पुढील वाटचालीकडे लक्ष लागले आहे. टर्नस गेल्या जवळपास २५ वर्षांपासून अॅपलशी जोडलेले आहेत. त्यांनी २००१मध्ये कंपनीच्या प्रॉडक्ट डिझाइन टीममधून कारकिर्दीला सुरुवात केली. यापूर्वी ते व्हर्च्युअल रिसर्च सिस्टीम्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअर होते.
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. आयपॅड, आयफोन, मॅक, एअरपॉड्स आणि अॅपल वॉचच्या हार्डवेअर विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, २०१३मध्ये ते हार्डवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष आणि २०२१मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष झाले. कुक यांच्या तुलनेत टर्नस यांची ओळख प्रामुख्याने अभियांत्रिकी आणि उत्पादन विकासातील तज्ज्ञ म्हणून आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अॅपलच्या हार्डवेअर नवकल्पनांना अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. फोल्डेबल आयफोन, एआयवर आधारित नवीन सुविधा, भविष्यातील उपकरणे आणि नव्या उत्पादन श्रेणींवर कंपनीचा भर वाढू शकतो. त्याचवेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात गुगलसह इतर टेक कंपन्यांशी स्पर्धा करणे, चीनवरील उत्पादन अवलंबित्व आणि वाढता नियामक दबाव ही आव्हाने टर्नस यांच्यासमोर कायम राहणार आहेत.