ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ जाहीर!

कमिन्स-स्टार्कचे पुनरागमन, लॅबुशेनला वगळले

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
सिडनी,
Australia's ODI squad announced. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र हे दोन्ही खेळाडू केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वे दौरा १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होतील. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.
 
 
 
Australia
 
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. मिचेल स्टार्कचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र कमिन्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे तिन्ही सामने खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मिचेल मार्शकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. दरम्यान, मार्नस लॅबुशेनला या दोन्ही मालिकांसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जूनमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नव्हती. शेवटच्या सामन्यात त्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद ५५ धावांची खेळी केली होती. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांचे संघात पुनरागमन झाल्याने तसेच युवा खेळाडूंना संधी देण्याच्या निवड समितीच्या भूमिकेमुळे लॅबुशेनला वगळण्यात आले आहे.
 
 
ऑस्ट्रेलियाने यावेळी कायमस्वरूपी कर्णधाराची घोषणा केलेली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत मिचेल मार्श संघाचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी असेल. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा नियमित कर्णधार आहे. मात्र मागील एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने केवळ दोन वनडे सामने खेळले आहेत. कमिन्सच्या कर्णधारपदाच्या काळात मिचेल मार्शने आतापर्यंत १५ वेळा त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात झेवियर बार्टलेट, ॲलेक्स केरी, कूपर कॉनोली, पॅट कमिन्स, जोएल डेव्हिस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मिचेल मार्श, ऑलिव्हर पीक, मॅथ्यू रेनशॉ, बिली स्टॅनलेक, मिचेल स्टार्क आणि ॲडम झाम्पा यांचा समावेश आहे. कमिन्स आणि स्टार्क हे केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असतील.