मुंबई
bandra accident वांद्रे परिसरात रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव इनोव्हा क्रिस्टाने धडक दिल्याने आठ वर्षीय अंश रविंद्र गुप्ता याचा मृत्यू झाला. अंश तिसरीत शिकत होता. या प्रकरणी पोलिसांनी मेघा रावल (४४) या महिलेला अटक केली असून, आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आरोपीला वाचवण्यासाठी अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर दबाव आणून त्याचा जबाब बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अंशचे वडील शेंगदाणे विकण्याचे काम करतात. रविवारी अंश घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. वांद्रे येथील सेंट अँड्र्यू चर्चजवळील बागेच्या परिसरातून जात असताना महबूब स्टुडिओजवळील जॉन बॅप्टिस्ट रोडवर तो रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने अंशला त्याच कारमधून होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
अपघातावेळी मेघा रावल या गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यांची कार अतिशय वेगात असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अंश अचानक समोर आल्यानंतरही गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि कारने त्याला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातानंतर मेघा रावल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रावल या फिटनेस कोच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संदीप सिंह यांचा जबाब बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
साक्षीदार संदीप सिंह यांनी स्वतः याबाबत खुलासा केल्याचे सांगण्यात येत आहे. रावल कुटुंबीयांकडून आपल्याला मोठी ऑफर देऊन जबाब बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी साक्षीदाराला फितूर करण्याचा प्रयत्न झाला का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिस या आरोपांवर रावल कुटुंबीयांविरोधात काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
अंशचा वाढदिवस अवघ्या bandra accident एका दिवसावर आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका निष्पाप मुलाचा जीव गेल्यानंतर आता साक्षीदाराच्या जबाबाशी संबंधित आरोप समोर आल्याने या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
या प्रकरणी मेघा रावल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, २८१ आणि १२५ तसेच सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, साक्षीदाराला जबाब बदलण्यासाठी कथितरित्या देण्यात आलेल्या ऑफरबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार असून, या प्रकरणात आणखी कोणते तथ्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.