मेलबर्न,
Ben Stokes enters the BBL after 12 years. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता बिग बॅश लीगमध्ये पुन्हा खेळताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्टोक्सने टी-२० लीगकडे आपला मोर्चा वळवला असून, आगामी बीबीएल हंगामासाठी त्याने ॲडलेड स्ट्रायकर्सशी करार केला आहे. तब्बल १२ वर्षांनंतर तो या स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. यापूर्वी २०१४-१५ च्या हंगामात त्याने मेलबर्न रेनेगेड्सचे प्रतिनिधित्व केले होते. स्टोक्सच्या उपलब्धतेमुळे ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार, सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न रेनेगेड्सकडूनही त्याला ऑफर मिळाल्या होत्या. मात्र अखेर त्याने ॲडलेड स्ट्रायकर्सची निवड केली. विशेष म्हणजे, स्टोक्स संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार असून, त्याला सुमारे ५,००,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच ३.४१ कोटी रुपये मानधन मिळणार आहे.
यापूर्वी स्टोक्सचे लक्ष प्रामुख्याने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडे होते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळण्याचा मार्ग त्याच्यासाठी खुला झाला आहे. त्यामुळे आगामी काळात त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्येही संपूर्ण हंगाम खेळताना पाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टोक्सला बीबीएलमध्ये आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडूनही प्रयत्न करण्यात आले होते. त्याच्या सहभागामुळे स्पर्धेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढेल, अशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटची अपेक्षा आहे. यंदाच्या बीबीएलमध्ये स्टोक्ससोबत न्यूझीलंडचा फलंदाज टिम सेफर्टही चर्चेत आहे. इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील प्रभावी कामगिरीनंतर त्यालाही बीबीएलमध्ये मोठे मानधन मिळण्याची शक्यता आहे.
स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे पाहिल्यास त्याने इंग्लंडसाठी १२२ कसोटी, ११४ एकदिवसीय आणि ४३ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीतील २२० डावांमध्ये त्याने ७२७३ धावा केल्या असून २५२ बळी घेतले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३४६३ धावा आणि ७४ बळी आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २६ बळी मिळवले आहेत. एकूण टी-२० क्रिकेटमध्ये स्टोक्सने १६२ सामने खेळले असून, त्यात त्याने ९३ बळी घेतले आहेत.