बॉर्डर-गावस्करच्या तयारीला सुरुवात

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारतात येणार

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
पुदुचेरी,
Border-Gavaskar series begin २०२७ मध्ये होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तयारीला सुरुवात करत ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारत ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात दोन चार दिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे. या संघात अनुभवी फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब यांचा समावेश करण्यात आला असून, भारत दौऱ्यातील कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात पुनरागमन करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.ऑस्ट्रेलियाच्या मागील ॲशेस मालिकेत खेळलेले वेगवान गोलंदाज ब्रेंडन डॉगेट आणि झाय रिचर्डसन यांनाही या दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत महली बियर्डमन आणि स्पेन्सर जॉन्सन यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल. खांद्याच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या झाय रिचर्डसनने अलीकडेच सात प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याला केवळ सहा बळी मिळाले असून, भारत ‘अ’ विरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
 
 

bider 
 
ऑस्ट्रेलिया ‘अ’च्या एकदिवसीय संघात भारतीय वंशाचे निखिल चौधरी आणि तनवीर संघा यांचा समावेश करण्यात आला आहे. युवा खेळाडू ऑली पीक आणि कूपर कॉनोली यांनाही संघात संधी मिळाली आहे. तनवीर संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी ६ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४, तर टी-२०मध्ये १० बळी आहेत. निखिल चौधरीने आतापर्यंत केवळ ३ टी-२० सामने खेळले असून, त्यात त्याने दोन यश मिळवले आहेत. चार दिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात ब्रेंडन डॉगेट, जॅक एडवर्ड्स, पीटर हँड्सकॉम्ब, सॅम हार्पर, लियाम हॅचर, कॅम्पबेल केलवे, सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, कोरी रॉचिसिओली, जेसन संघा आणि लियाम स्कॉट यांचा समावेश आहे.
 
एकदिवसीय संघात महली बियर्डमन, निखिल चौधरी, बेन ड्वार्शुइस, जॅक एडवर्ड्स, ॲरॉन हार्डी, स्पेन्सर जॉन्सन, सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, मिच ओवेन, जोश फिलिप, तनवीर संघा, लियाम स्कॉट आणि लॅकलन शॉ यांना स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’चा भारत दौरा २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पुदुचेरी येथे होणाऱ्या पहिल्या चार दिवसीय सामन्याने सुरू होईल. त्यानंतर २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत त्याच ठिकाणी दुसरा चार दिवसीय सामना होईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर, दुसरा सामना ९ ऑक्टोबर, तर तिसरा आणि अखेरचा सामना ११ ऑक्टोबर रोजी पुदुचेरी येथे खेळवला जाणार आहे.