नागपूर
book publication भाषा, देश आणि काळाच्या सीमा ओलांडून मानवी संवेदनांचा वैश्विक अनुभव देणाऱ्या इंग्रजी कवितांना मराठी भाषेचा सर्जनशील स्पर्श देणाऱ्या डॉ. सावन गिरीधर धर्मपुरीवार यांच्या टिपणवही (देशोदेशीच्या इंग्रजी कवींच्या कवितांचे रूपांतरण) या अनुवादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नुकतेच रामटेक येथे संपन्न झाले.
वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास विद्यासागर शिक्षण संस्थेच्या सचिव अनिता जयस्वाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विद्यासागर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर तसेच महाराष्ट्रातील नामवंत कवी, साहित्यिक व समीक्षक डॉ. गिरीश सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी डॉ. सावन धर्मपुरीवार यांच्या साहित्यिक, संशोधनात्मक आणि अनुवाद कार्याचे कौतुक केले. विविध भाषांतील साहित्यकृतींचा आशय, सौंदर्य आणि संवेदनशीलता मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यात अनुवादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. टिपणवही हा संग्रह मराठी वाचकांना जागतिक इंग्रजी कवितेचा समृद्ध आस्वाद देणारा असून, मराठी अनुवाद साहित्यामध्ये त्याची मोलाची भर पडल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
डॉ. सावन धर्मपुरीवार हे रामटेक येथील विद्यासागर कला महाविद्यालयात गेल्या २२ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. इंग्रजी व मराठी भाषेचे अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी आणि अनुवादक म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या विविध साहित्यकृतींसह मराठी व इंग्रजी भाषेतील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रा. तु. म. नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक-लेखक पुरस्कार (२०२१), अभिरुची गौरव पुरस्कार (२०१४) आणि नॅशनल नवोदयन् पुरस्कार (२०२६) यांसह विविध सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
टिपणवहीमध्ये २२ नामवंत इंग्रजी कवींच्या एकूण ७० कवितांचा समावेश आहे. वैश्विक काव्यसंवेदना आणि मराठी भाषा यांच्यातील हा सर्जनशील संवाद हीच टिपणवहीची खासियत आहे. विशेष म्हणजे पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ धर्मपुरीवार यांनी आपल्या कोलाज चित्राच्या माध्यमातून साकारले आहे या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, साहित्यप्रेमींमध्ये या पुस्तकाविषयी विशेष उत्सुकता दिसून येत आहे.