ओबीसी चळवळीत फूट पडल्याची चर्चा

हाके यांच्या ओबीसी आंदोलनाला तायवाडेंचा पाठिंबा नाही

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई
laxman hake राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे यांनी गनिमी काव्याने मराठ्यांनी मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा दावा करत प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी मोर्चासह मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला यापूर्वीच परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केल्याने ओबीसी चळवळीत फूट पडली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 

laxman hake vs babanrao taiwade: obc movement faces internal differences over mumbai march 
लक्ष्मण हाके यांनी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. ओबीसी आंदोलकांसह आपण आज मुंबईकडे रवाना होणार असून पोलिसांनी आपले काम करावे, असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी अडविल्यास आपण रस्त्यातच बसणार असल्याचा इशाराही हाके यांनी दिला. मुख्यमंत्र्यांची आई-माई काढली तेव्हाच दखल घेतली जाणार का, असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ओबीसींचा केवळ मतांसाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शंभूराज देसाई हे नालायक माणूस असून त्यांना ओबीसींचे काहीही देणे-घेणे नाही, अशी तीव्र टीका हाके यांनी केली.ओबीसींचे आमदार आणि नेते हे पक्षाचे गुलाम झाले असल्याचा आरोप करत हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. जरांगे पाटील हे ओबीसींचे आरक्षण संपवू पाहत असल्याचा दावा त्यांनी केला. ओबीसींच्या न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात २२ लाख २० हजार ५७७ कुणबी प्रमाणपत्रे वाटल्याचे बोलले जात आहे, असा दावा करत हाके यांनी सरकारवर टीका केली. बावनकुळे यांचा सत्कार असो किंवा मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार असो, हे आता सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन-चार दिवसांत जरांगे यांची भावना काय आहे, हे पाहायला मिळाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठा समाजाची लढाई संपली असली तरी ओबीसींची लढाई आता एक सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असा दावा हाके यांनी केला. मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यानंतर ओबीसी हा वर्गच दिसणार नाही, असे सांगत आता त्यात केवळ मराठा आणि कुणबी राहतील, असा आरोप त्यांनी केला. ओबीसी बांधवांना हा निर्णय लढवण्यासाठी आता संघर्ष करावा लागेल, असेही ते म्हणाले.
ओबीसींचे संपूर्ण आरक्षण मराठा समाजाला देऊन टाकल्यासारखी परिस्थिती असल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नसेल, असे ओबीसी आरक्षणाचे नुकसान सध्याच्या सरकारने केल्याचे हाके यांनी म्हटले. मनोज जरांगे यांच्या संस्कारांवरही त्यांनी टीका केली. जरांगे यांचा चेहरा पाहिल्यानंतर रात्रीच्या बातम्या सुरू झाल्या की महिला टीव्ही बंद करतात, असा दावा करत जरांगे यांच्या वक्तव्यांमुळे महिलांच्या मनात लज्जा निर्माण होते, असे ते म्हणाले. अशा व्यक्तीला मराठा समाजाने नेतृत्व म्हणून स्वीकारले, हे दुर्दैवी असल्याचेही हाके यांनी नमूद केले.
मराठा समाजाला उद्देशून बोलताना, आता ओबीसींच्या दारात कुठल्या नैतिकतेने मत मागायला जाणार, असा सवालही हाके यांनी केला. एक सप्टेंबरपासून लाखोच्या संख्येने ओबीसींचा जनसमुदाय मुंबईत जमणार असल्याचा दावा करत, एक सप्टेंबरला ओबीसी म्हणजे काय हे सरकारला दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी आपल्याला काहीही घेणे-देणे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, हाके यांच्या ओबीसी laxman hake  मोर्चाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली आहे. हाके यांच्या आजच्या ओबीसी मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नसल्याचे डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. मागण्या स्पष्ट नसल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजच्या मोर्चात सहभागी होणार नसून हाके यांच्या मोर्चाला महासंघाचा पाठिंबा नाही, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले.हाके हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतलेल्या या भूमिकेमुळे ओबीसी आंदोलनातील मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या संघर्षात ओबीसी चळवळीची पुढील दिशा काय राहणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.