आठ महिन्यांनंतर महिमा म्हात्रेने चेहऱ्यावरील पट्टी हटवली

शूटिंगदरम्यान घोडा उधळल्याने झाला होता अपघात

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई
mahima mhatre झी मराठीवरील लोकप्रिय हॉरर मालिका ‘तुला जपणार आहे’मधील मुख्य नायिका महिमा म्हात्रे (मीरा) हिच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या तब्बल आठ महिन्यांपासून चेहऱ्यावर पट्टी लावून मालिकेचे शूटिंग करणाऱ्या महिमाने अखेर ही पट्टी हटवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या अपघातामागील नेमके कारणही चाहत्यांसोबत सांगितले आहे.
 

mahima mhatre 
मालिकेच्या शूटिंगदरम्यान घोडा उधळल्याने महिमाचा अपघात झाला होता. एका सीन्ससाठी ती घोड्यावर स्वार होऊन शूटिंग करत होती. सुरुवातीचे काही शॉट्स व्यवस्थित पार पडल्यानंतर अचानक घोडा बिथरला आणि वेगाने धावू लागला. महिमाने लगाम खेचून घोड्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आटोक्यात न आल्याने घोड्यासह ती खाली पडली. या अपघातात महिमाच्या नाकावर आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दोन ते तीन दिवस उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी महिमाला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कामाप्रती असलेली तिची निष्ठा कायम राहिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही अवघ्या आठवडाभरात तिने पुन्हा सेटवर हजेरी लावली आणि मालिकेचे शूटिंग सुरू केले.
चेहऱ्यावरील जखमेचा डाग mahima mhatre अधिक गडद होऊ नये, तसेच सूर्यप्रकाशाचा जखमेवर परिणाम होऊ नये, यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिमा शूटिंगदरम्यान चेहऱ्यावर पट्टी लावत होती. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे चाहते या पट्टीमागील कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. आता जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर महिमाने चेहऱ्यावरील पट्टी काढली आहे. तिच्या या खुलाशामुळे चाहत्यांना गेल्या आठ महिन्यांपासूनच्या त्या पट्टीमागचे कारण समजले आहे.