कोलकाता
brishti mukherjee तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भाची वृष्टि मुखर्जी (२८) यांचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील कुसुंबा गावातील निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मंगळवारी दुपारी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीतून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा देत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी नमूद केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वृष्टि मुखर्जी या ममता बॅनर्जी यांचे ममेरा भाऊ निहार मुखर्जी यांच्या कन्या होत्या. निहार मुखर्जी यांनी रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. मुखर्जी कुटुंबीयांचे माहेर रामपूरहाटमधील कुसुंबा गावात आहे. वृष्टि या स्थानिक शाळेत ग्रुप-सी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, वृष्टि मुखर्जी गेल्या काही वर्षांपासून नैराश्याशी झुंज देत होत्या आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते. कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर सरकारी अनुदानित शाळांमधील नियुक्त्या रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्यांची नोकरी गेली होती. सरकारी शाळांमधील भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांना सुमारे ९० टक्के ओएमआर शीटमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. या तपासात वृष्टि मुखर्जी यांच्यासह अनेक उमेदवारांची नावे समोर आली होती. त्यांना कथितरीत्या या गैरप्रकाराचा फायदा झाल्याचा आरोप होता. त्यानंतर कायदेशीर कारवाई झाली आणि वृष्टि यांची नोकरी गमवावी लागली. त्याचबरोबर पतीसोबत त्यांचा घटस्फोटाचा खटलाही सुरू होता.
दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी brishti mukherjee ममता बॅनर्जी यांच्यावर आणखी एक दुःखद प्रसंग ओढवला होता. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रामपूरहाटचे पाच वेळा आमदार राहिलेले आशीष बॅनर्जी यांचा बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील पक्ष कार्यालयात मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली होती. आशीष बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल सरकारमध्ये शालेय शिक्षण आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. ते विधानसभेचे उपसभापतीही राहिले होते. २०२६च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे ध्रुबा साहा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.वृष्टि मुखर्जी यांच्या मृत्यूमुळे कुसुंबा गावासह रामपूरहाट परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.