मुंबई
manoj jarange patil मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. सरकारला वेळ देऊनही कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या नाराजीमुळे त्यांनी आमरण उपोषणाची हाक दिली असून, २९ ऑगस्टपासून ते उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून प्रकृती खालावली आहे. दरम्यान, आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
वैद्यकीय तपासणीस जरांगेंचा नकार
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी जरांगे यांना उठवण्याचा प्रयत्न केला तसेच रक्तदाब तपासण्याची विनंती केली. मात्र, जरांगे यांनी पथकाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी हाताने इशारा करत तपासणी करण्यास नकार दिला. रात्रीपासूनच त्यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिल्याची माहिती आहे.
“आम्ही त्यांना वारंवार विनंती करत आहोत. त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला आहे. आमची वैद्यकीय तपासणी टीम इथेच आहे. आम्ही दर दोन तासांनी येऊन त्यांना विनंती करू. काल आम्ही तपासणी केल्यावर बीपी १३० आणि शुगर ७०च्या आसपास होती. आम्ही त्यांना विनंती करत आहोत,” अशी माहिती वैद्यकीय अधिकारी विजय वाकोडे यांनी दिली.
१०० फूट उंच जलकुंभावर आमरण उपोषण
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नांदेडमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील तब्बल १०० फूट उंच जलकुंभावर बसून मराठा सेवक लक्ष्मण कदम आणि ओमप्रकाश कदम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने सोनवणे कुटुंब पुन्हा आंतरवाली सराटीत
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील सृष्टी सोनवणे हिचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. व्हॅलिडिटी मिळाली नसल्याने जात पडताळणी समितीने तिचे प्रमाणपत्र रद्द केले. कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी मिळावी, यासाठी सृष्टी सोनवणे हिने यापूर्वी आंदोलन केले होते. आता सोनवणे कुटुंब पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले आहे.
सृष्टी सोनवणे हिच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे. कोणत्या तरी मंत्र्याने फोन करून प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आता एक तर तीन लाख रुपये फी भरावी लागेल किंवा मुलीचे एक वर्ष वाया जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.
सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला जाणार
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
हे शिष्टमंडळ सरकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिष्टमंडळाच्या भेटीची वेळ निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील पुढील संवादाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.