पुणे
obc जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, उपोषणाला चार दिवस उलटल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे सरकारच्या प्रतिनिधींकडून जरांगे यांच्या भेटीसाठी धावाधाव सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन तापले असतानाच दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, ‘आम्ही 1001 टक्के मुंबईच्या दिशेने निघालो आहोत,’ असा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. एकाच वेळी राज्यात दोन समाजांकडून आंदोलनाचा नारा दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ओबीसी आंदोलक पुण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा एल्गार मोर्चा अडवला. मोर्चाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधत फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
‘आम्हाला अटक करा. आमच्यावर लाठीचार्ज करा. जेलमध्ये टाका. आमचं आरक्षण संपवा. आम्ही 1001 टक्के मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. आम्ही रस्त्यावर येऊन थांबलो आहोत. आमचं घर कुठं, आम्ही उभे कुठे… आमची माणसं आल्यावर आम्ही मुंबईच्या दिशेने निघू,’ असे हाके यांनी सांगितले. सरकार आम्हाला मोजत नाही, आमचे आरक्षण टिकवत नाही आणि आमचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
‘आमचं आरक्षण संपवलं, तसं आमचं आंदोलन संपवण्याचं काम सुरू आहे. आम्ही पुढे जाऊ. आमच्या हक्क आणि अधिकारांची लढाई आहे. आम्ही संघर्ष करू. रस्त्यावर येण्यास कोणी मजबूर केलं? आमचं सरकारने ऐकलं नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. मुख्यमंत्री आमचं ऐकत नाहीत. मनोज जरांगेंना दिवसांतून 10 वेळा फोन करतात. संजय शिरसाट यांनी 250 वेळा कॉल केल्याचे मनोज जरांगेंनी सांगितले,’ असा दावा हाके यांनी केला.
यावेळी हाके यांनी सरकारवर टीका करताना, ‘चौथी नापास, शिवराळ भाषा, संविधानाची तत्वे पायदळी तुडवणारा माणूस,’ अशा शब्दांत टीका केली.
दरम्यान, ओबीसी आंदोलनातच फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला असला, तरी या आंदोलनाबाबत बबनराव तायडे यांनी युटर्न घेतला आहे. लक्ष्मण हाके यांच्या आजच्या ओबीसी मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नसल्याचे तायडे यांनी म्हटले आहे.‘लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नसल्याने आजच्या मोर्चात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी नाही. आजच्या हाके यांच्या ओबीसी मोर्चाला आमचा पाठिंबा नाही,’ असे बबनराव तायडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबतच ओबीसी आंदोलनही आक्रमक होत असताना त्यातील अंतर्गत मतभेद समोर आल्याने राज्यातील आरक्षणाचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.