नवी दिल्ली,
Modi confident of 7.8% GDP जगभरात युद्ध, आर्थिक अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांसारखी अनेक आव्हाने कायम असतानाही भारताने ७.८% जीडीपी वाढ नोंदवत वेगवान प्रगती सुरू ठेवली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त करताना, ही वाढ देशातील १.४ अब्ज नागरिकांच्या सामूहिक शक्ती, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे म्हटले आहे.इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. ७.८% जीडीपी वाढीचा टप्पा गाठल्याने देशात आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ महामारीनंतरही जागतिक परिस्थितीत स्थिरता आलेली नाही. त्यात युद्धजन्य परिस्थिती, विविध संकटे आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यांचा सामना जगाला करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने आपली प्रगती कायम ठेवली असून, ही बाब देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते, असे मोदी यांनी नमूद केले.

भारताने पुढील काळात ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या विचारांना अधिक महत्त्व देण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. केवळ मौजमजेसाठी परदेशात जाणे किंवा परदेशात विवाह करण्याऐवजी देशातच विवाह करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच अत्यावश्यक गरज नसल्यास सोने खरेदी टाळण्याचे आवाहन करत आत्मनिर्भरतेवर भर देण्याची भूमिका त्यांनी मांडली. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेला अधिक चालना दिल्यास भारताच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होताना तरुण पिढीला ‘विकसित भारत’ देण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. आज केलेल्या कठोर परिश्रमातून तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडू नये, असेही त्यांनी म्हटले. देशाची धोरणे योग्य असून हेतूही स्पष्ट आणि उदात्त आहेत, असे सांगत १.४ अब्ज भारतीयांची एकत्रित ताकद भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.