तियानजिन,
Modi, Putin, and Jinping in same frame शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (१ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी आपुलकीने हस्तांदोलन केले. या भेटीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.एससीओ शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सहभागी देशांच्या नेत्यांचे सामूहिक फोटोसेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुतिन आणि जिनपिंग सभागृहात पंतप्रधान मोदी यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले. या प्रसंगादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ काही अंतरावर उभे राहून हे दृश्य पाहताना दिसले. मात्र मोदी आणि शाहबाज शरीफ यांच्यात यावेळी कोणताही संवाद झाल्याचे दिसून आले नाही.

दरम्यान, एससीओच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून सदस्य देशांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. दहशतवाद आजही संपूर्ण मानवतेसमोरील गंभीर आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाविरोधातील लढा केवळ एखाद्या घटनेनंतरची कृती किंवा प्रतिक्रिया यापुरता मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.दहशतवादी संघटनांना मिळणारा आर्थिक पाठिंबा, तरुणांची होणारी भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने यांसारख्या घटकांविरोधात व्यापक कारवाई करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या सर्व बाबींची संपूर्ण परिसंस्था मोडून काढल्याशिवाय दहशतवादाचा सामना प्रभावीपणे करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. शांततापूर्ण आणि सुरक्षित युरेशिया निर्माण करण्याचे उद्दिष्ट अफगाणिस्तानमधील शांतता व स्थैर्याशी जोडलेले असल्याचेही मोदी यांनी सांगितले. अफगाणिस्तानच्या जनतेच्या विकासासाठी तसेच मानवतावादी मदतीसाठी भारत यापूर्वीही योगदान देत आला आहे आणि भविष्यातही हे सहकार्य सुरू ठेवेल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.