नवी दिल्ली
Mukesh Kumar's sensational bowling सेंट्रल झोनविरुद्ध सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी 2026 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ईस्ट झोनच्या मुकेश कुमारने प्रभावी गोलंदाजी करत दोन्ही डावांत मिळून 7 विकेट्स घेतल्या. मात्र, विकेट्स मिळवतानाच त्याच्या गोलंदाजीतील नो-बॉलची संख्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुकेशने या सामन्यात तब्बल 14 नो-बॉल टाकले. त्याच्या या गोलंदाजीमुळे ईस्ट झोनचा कर्णधारही नाराज असल्याचे दिसून आले.पहिल्या डावात मुकेश कुमारने 16 षटके टाकत 56 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केले. मात्र, या स्पेलमध्ये त्याने 6 नो-बॉल आणि एक वाइड टाकला. दुसऱ्या डावातही त्याच्या गोलंदाजीत अशीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. त्याने 12 षटके गोलंदाजी करताना 44 धावा दिल्या आणि 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. या डावात त्याने 8 नो-बॉल आणि 2 वाइड टाकले. अशाप्रकारे सामन्यातील दोन्ही डाव मिळून मुकेशच्या खात्यात 14 नो-बॉल आणि 7 विकेट्स जमा झाल्या.

सामन्याच्या सुरुवातीला सेंट्रल झोनने प्रथम फलंदाजी करत 266 धावा केल्या. या डावात रिंकू सिंहने अर्धशतक झळकावले, तर आर्यन जुयालने 46 धावांची खेळी केली. त्यानंतर ईस्ट झोननेही वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात 266 धावाच केल्या. त्यामुळे दोन्ही संघांचा पहिला डाव समान धावसंख्येवर संपला.या सामन्यात वैभव सूर्यवंशीने विशेष कामगिरी करत दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक करणारा सर्वात युवा फलंदाज होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याच्या आणि अभिमन्यू ईश्वरनच्या अर्धशतकी खेळीमुळे ईस्ट झोनने सेंट्रल झोनच्या 266 धावांची बरोबरी साधली.
दुसऱ्या डावात मात्र सेंट्रल झोनचा डाव 50.2 षटकांत 158 धावांवर आटोपला. या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. अमन मोखडेने 89 चेंडूंत 40 धावा करत संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. अरशद खानने 25, तर हर्ष दुबेने 24 धावांचे योगदान दिले. आता ईस्ट झोनसमोर अंतिम फेरी गाठण्यासाठी 159 धावांचे लक्ष्य आहे. मुकेश कुमारने 7 विकेट्स घेत संघाला मजबूत स्थितीत आणले असले, तरी त्याच्या 14 नो-बॉलमुळे गोलंदाजीतील शिस्तीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.