नागपूर
nagpur-garden-club नागपूर गार्डन क्लबतर्फे १२४ च्या मान्सून पुष्प प्रदर्शनाचे आयोजन रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत स्थानिक श्रीमती कुसुमताई वानखेडे हॉल, अलंकार टॉकीज, नॉर्थ अंबाझरी मार्ग, धरमपेठ,येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा राजश्री बापट यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी पत्रपरिषदेत अनुजा परचुरे, समित आदमने, नितीन दाते, तन्मय गोडघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्व. श्रीमती कुसुमताई वानखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या प्रदर्शनासोबतच ५१ व्या इनडोअर प्लांट्स प्रदर्शनाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. नागपूर गार्डन क्लबच्या वतीने आयोजित मान्सून पुष्प प्रदर्शनात फुले, वनस्पती, बागकाम आणि उद्यानविद्येतील उत्कृष्टतेचा एक वार्षिक उत्सव असल्याची माहिती राजश्री बापट यांनी दिली. या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या वनस्पती आणि फुलांची आकर्षक मांडणी पाहायला मिळणार आहे.
प्रदर्शनातील विविध विभाग करण्यात आले असून प्रदर्शनात अनेक विभागांतर्गत प्रवेशिकांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने इनडोअर आणि हाऊस प्लांट्स (घरातील शोभेची रोपे), कट रोझेस (तोडलेली गुलाब फुले) बोन्साय, पुष्परचना आणि सजावट, भाजीपाला बास्केट, कॅक्टस आणि सक्युलंट्स आदींचा समावेश आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि ’फ्लोरल कार्पेट’ स्पर्धा
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि बागकामाबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने, नागपूर गार्डन क्लबतर्फे शाळांसाठी चित्रकला आणि ’फ्लोरल कार्पेट’ (फुलांची रांगोळी/सजावट) स्पर्धाचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती अनुजा परचुरे, समित आदमने यांनी दिली. या स्पर्धाचा उद्देश विद्यार्थ्यांना फुले, वनस्पती आणि नैसर्गिक पर्यावरणाबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक सर्जनशील व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा असल्याची माहिती नितीन दाते यांनी दिली.
यंदाचा मान्सून शो व इनडोअर प्लांट्स प्रदर्शन हे बागकाम प्रेमी, कुटुंबे, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत आकर्षक आणि रंगीबेरंगी अनुभव देणारा ठरणार आहे. सर्व बागकाम प्रेमी आणि निसर्गप्रेमींना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन राजश्री बापट यांनी केले आहे.
विशेष बागकाम कार्यशाळा
नागपूरकरांच्या हिरव्या छंदाला नवी उमेद देण्यासाठी वेस्ट हायकोर्ट रोड,सिव्हिल लाईन्स येथील नागपूर गार्डन क्लबच्या परिसरात दरवर्षी विशेष बागकाम कार्यशाळेचे आयोजन केल्या जाते. या उपक्रमात बागकामाच्या वेगवेगळ्या पैलूंवर मार्गदर्शन केले जाते. याशिवाय आकर्षक पुष्परचना, फुलांच्या सजावटीची कला प्रत्यक्ष शिकण्याची संधी दिल्या जाते. मूलभूत बागकाम, रोपांची निवड, कुंड्यांची काळजी, खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केल्या जाते.