नाशिक
nashik news नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेने मृत्यूशी दिलेल्या झुंजीने सर्वांनाच थक्क केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आल्या आहेत. २९ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या चंद्रभागा आजी बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्या होत्या. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याविना अंधाऱ्या विहिरीत अडकूनही त्यांनी जिद्द आणि धैर्याच्या जोरावर आपला जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा आजी २९ ऑगस्ट रोजी मुलाकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच त्या बसस्थानकाजवळील एका उघड्या विहिरीत पडल्याचे समोर आले.
विहिरीत पडल्यानंतरही आजींनी धीर सोडला नाही. त्यांनी मोटारीच्या पाईपला आणि दोरीला घट्ट पकडून ठेवले. विहिरीत असलेले साप, किडे आणि खेकडे यांची भीती न बाळगता त्यांनी आपली पकड कायम ठेवली. अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस उपाशी-तहानलेल्या अवस्थेत राहूनही जगण्याची आशा सोडली नाही. मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांनी दाखवलेल्या या धैर्यामुळे त्यांचा जीव वाचला.
दरम्यान, स्थानिक युवक गणेश पारवे यांच्या नजरेस विहिरीतील हे दृश्य पडले. त्यांनी तत्काळ इतर नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक युवकांसह चांदवड पोलीस आणि नगरपरिषदेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
आजींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून बचावकार्याला सुरुवात केली. अखेर खाटेच्या मदतीने चंद्रभागा आजींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची सुटका होताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
चंद्रभागा आजींना तातडीने nashik news पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या नेमक्या कशा विहिरीत पडल्या, याचा तपास आता चांदवड पोलीस करत आहेत.दरम्यान, या उघड्या विहिरीत यापूर्वीही अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने सुरक्षा जाळी आणि संरक्षक कठडे बसवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत अडकून मृत्यूशी झुंज देणाऱ्या ७५ वर्षीय चंद्रभागा आजींचे धैर्य आणि प्रसंगावधान, तसेच स्थानिक युवकांनी दाखवलेली तत्परता यामुळे अखेर त्यांना जीवनदान मिळाले. त्यामुळे ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना चांदवड परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.