महाराष्ट्र माफियामुक्त करण्याचे काम देवाभाऊंचे!

नवनाथ बनांचा दावा

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Navnath Ban's claim मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत राऊत यांच्यावर जोरदार टीका करत फडणवीस यांची पाठराखण केली. महाराष्ट्रातील माफियागिरी संपवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, माफियांचा कर्दनकाळ होत राज्याला माफियामुक्त करण्याचे काम ‘देवाभाऊं’नी केल्याचा दावा बन यांनी केला. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर टीका करताना बन यांनी त्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. राऊत यांचा ‘भोंगा सनईसारखा नसून राहुल गांधींचा पोंगा वाजवण्याचे काम करत आहे’, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

g6767878
 
फडणवीस यांनी राऊत यांच्या कथित ‘फेक नॅरेटिव्ह’चा भांडाफोड केला असून त्यांच्या आरोपांची हवा निघून गेल्याचा दावा बन यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अभिजीत दीपके यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कथित वक्तव्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या मुद्द्यावरून बन यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरही टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असून ते सर्वांसाठी वंदनीय आहेत, असे सांगताना मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांची तुलना करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दादरमधील उबाठा गटाच्या भवनासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा उल्लेख करत त्यांनी अमित ठाकरे आणि संजय राऊत यांना सवाल केला. तसेच मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याच्या मुद्द्यावर आंदोलन का केले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
 
मतदार यादीच्या मुद्द्यावरूनही नवनाथ बन यांनी विरोधकांवर आरोप केले. विधानसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी कथित दुबार मतदारांबाबत सादरीकरण केले होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी हिंदू मतदारांवर आक्षेप घेतल्याचा दावा त्यांनी केला. संजय राऊत यांनी काही धर्माच्या लोकांना मतदार यादीतून वगळल्याचा आरोप केला असल्यास ‘काही धर्माच्या म्हणजे कोणाच्या?’ असा सवाल बन यांनी केला. मुंबईच्या मतदार यादीत रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांची कथित मते घुसवल्याचा आरोप करत त्यांनी SIR प्रक्रियेला विरोध का केला जात आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. हे सर्व आरोप भाजपची राजकीय भूमिका असून, त्यावर संजय राऊत किंवा विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.