मुंबई,
News about Cooper Hospital मुंबईतील कूपर सरकारी रुग्णालयात बुरखा परिधान केलेल्या महिलेला प्रवेश नाकारल्याचा आरोप समोर आला आहे. जहां आरा या व्यवसायाने वकील असलेल्या महिलेने हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या बाहेर पोहोचल्या असता महिला सुरक्षा रक्षकाने त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. आपली ओळख स्पष्ट करूनही बुरखा परिधान केल्यामुळे प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.जहां आरा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे प्रवेश रोखण्याचे कारण विचारले. त्यावेळी बुरखा घातलेल्या महिला रुग्णालयात येतात आणि त्यादरम्यान मुलांचे अपहरण होत असल्याचे कारण सुरक्षा रक्षकाने दिल्याचा त्यांचा दावा आहे. यानंतर जहां आरा यांनी अशा प्रकारच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केला.
मुलांचे अपहरण होण्याचा संबंध एखाद्या विशिष्ट पोशाखाशी जोडणे योग्य आहे का, असा सवाल जहां आरा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, साडी परिधान केलेल्या महिलांकडूनही रुग्णालयातून मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कारवाई करायची असेल तर संबंधित व्यक्तींवर करावी, मात्र केवळ पोशाखाच्या आधारे महिलांना लक्ष्य करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.जहां आरा यांनी बुरख्यासोबतच दाढी आणि टोपीसारख्या गोष्टींनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी वाडिया रुग्णालयातील साडी परिधान केलेल्या महिलांकडून मुले चोरीला गेल्याच्या घटनांचा उल्लेखही केला. कोणत्याही विशिष्ट पेहरावाला आपला विरोध नसून बुरख्याबाबतच विशेष आक्षेप का घेतला जातो, हा आपला प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेबाबत जहां आरा यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ओळखीची माहिती दिल्यानंतरही बुरखा काढल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. आपल्यासोबत घडलेला प्रकार अन्य महिलांसोबतही घडत असल्याचे आपण पाहत असल्याचे त्यांनी सांगितले आणि या प्रकाराविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका व्यक्त केली. दरम्यान, या आरोपांबाबत कूपर रुग्णालय प्रशासनाने भाष्य करण्यास नकार दिला आहे.