मोठी बातमी...सुटे तेल विक्रीला 1 वर्षाची मुभा!

तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर सरकारची स्थगिती

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई,
One-year extension for the sale of loose oil खाद्यतेलाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुढे करत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, या निर्णयाला तेली समाज आणि खाद्यतेल विक्रेत्यांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खाद्यतेल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सुटे तेल विक्रीवरील निर्णयाला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत सुटे खाद्यतेल विक्रीसंदर्भातील कायदा 2011 मध्ये करण्यात आला आहे. खाद्यतेलाची गुणवत्ता हा त्यामागील महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, सुटे तेल खरेदी करणाऱ्या गरीब ग्राहकांचाही विचार करणे आवश्यक असल्याने कायदा आणि सामान्य नागरिकांच्या गरजा यामध्ये मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना सध्या एक वर्षाची तात्पुरती सूट देण्यात आली असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या कालावधीत व्यावसायिकांनी आवश्यक बदल करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
 
 
One-year extension for the sale of loose oil
पारंपरिक पद्धतीने खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्यांना कायद्यानुसार कोणते बदल करावे लागतील, यासाठी एफडीए आणि व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. गरज भासल्यास या प्रक्रियेत राज्य सरकारकडूनही मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील एका वर्षात या समितीच्या माध्यमातून व्यावसायिकांच्या अडचणी आणि कायदेशीर निकष यांचा विचार केला जाणार आहे.खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी बैठकीनंतर सांगितले की, बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यातून मार्ग काढत मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची सूट दिली आहे. प्रस्तावित समितीत व्यापारी आणि अधिकारी असतील. कोरोनानंतर अनेकांनी लाकडी घाणे सुरू केले असून काहींनी कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला आहे. सुट्या तेलात भेसळ होते, असा ग्राहकांमध्ये संभ्रम असल्याचेही त्यांनी म्हटले. 1960 च्या कायद्यात बदलत्या परिस्थितीनुसार सुधारणा झाल्याचे सांगत त्यांनी देशात अन्यत्र सुट्या तेलावर बंदी नसल्याचा दावा केला. या व्यवसायात महिलांचाही मोठा सहभाग असल्याने छोट्या, मध्यम आणि महिला विक्रेत्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, असे ठक्कर यांनी नमूद केले.