‘टेक्सास स्मोकिंग शॉपी’वर पोलिसांचा छापा

- तरुण-तरुणींचे पाय हुक्का पार्लरकडे - पोलिस आयुक्तांच्या आदेशाला ठाणेदाराकडून हरताळ - अवैध हुक्का पार्लर : ९४ हजारांच्या मुद्देमाल जप्त

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
texas smoking shoppee वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी परिसरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर ‘एस्कॉर्ट’ पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह हुक्का पॉट व इतर साहित्य असा एकूण ९४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या हुक्का पार्लरला वाठोडा पोलिसांचा आशिर्वाद होता, अशी माहिती समोर आली आहे.
 
 
texas smoking shoppee
 
 
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ड्रग्ज फ्री नागपूर अभियान सुरु केले आहे. मात्र, काही ठाणेदार या अभियानाला सकारात्मकपणे घेत नाहीत. ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासून अवैध धंदे सध्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु आहेत. मंगळवारी पहाटे ३ वाजता पथकाने उमरेड रोड, दिघोरी येथील टेक्सास स्मोकिंग शॉपीमध्ये धाड टाकली. या वेळी कॅफेचा व्यवस्थापक आरोपी ओंकार संदीप मडावी (२०, आदर्शनगर, नंदनवन) हा ग्राहकांना शासन-प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवताना आढळून आला. परवान्याबाबत चौकशी केली असता आरोपींनी कोणताही परवाना सादर केला नाही. कॅफे मालक अविनाश पर्वतलाल पांडे (साईनगर, वाठोडा) आणि मॅनेजर ओंकार मडावी हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना अवैध हुक्का पार्लर चालवत असल्याचे निष्पन्न झाले.texas smoking shoppee पोलिसांनी घटनास्थळावरून ३८ हजार १०० रुपयांची रोकड तसेच वेगवेगळ्या आकाराचे हुक्का पॉट, नळ्या, विविध फ्लेव्हरचे तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण ९४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कॅफे मालक व मॅनेजरविरुद्ध वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.