गणेशोत्सवात लेझर, प्लाझ्मा साऊंडला बंदी

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
पुणे
ganeshotsav गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी यंदा लेझर लाईट तसेच प्लाझ्मा साऊंडच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. ध्वनी आणि प्रकाशप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिला आहे.
 

ganeshotsav 
गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पडावा, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी उत्सवाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रमुख १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पाषाण रस्त्यावरील पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सवातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, ध्वनी व प्रकाशप्रदूषण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सवातील मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांचा वापर होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता, निर्धारित डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. विशेषतः मोठ्या आवाजासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘प्लाझ्मा साऊंड’चा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रखर लेझर किरणांचाही वापर करू नये, असे पोलिसांनी गणेश मंडळांना स्पष्टपणे सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यात यंदा पाच हजारांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आणि सुमारे एक लाख ७० हजार घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. या मोठ्या प्रमाणावरील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंडळांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधत विविध समस्या आणि नियोजनाबाबत चर्चा केली. बैठकीत गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा तसेच विसर्जन घाटांवरील नदीपात्रातील वाढती पाण्याची पातळी यांसारख्या समस्या पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या. संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधून या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात होणारी गर्दी आणि मिरवणुका लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही सर्व गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. ध्वनी आणि प्रकाशप्रदूषणाला आळा घालत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचा भर राहणार आहे.