रजत बेदी यांची मराठी सिनेमात एन्ट्री

‘बंधू’च्या प्रस्तुतकर्त्याची जबाबदारी स्वीकारत नव्या अध्यायाची सुरुवात

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई
rajat bedi अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींचा मराठी सिनेमाशी वाढता संबंध चर्चेत आला आहे. आता या यादीत अभिनेता रजत बेदी यांचेही नाव जोडले गेले आहे. हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केलेले रजत बेदी आगामी ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत आपली नवी इनिंग सुरू करण्यास सज्ज झाले आहेत.
 

rajat bedi  
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठित वारसा लाभलेल्या बेदी कुटुंबाची उपस्थिती आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांचे सुपुत्र आणि ख्यातनाम उर्दू साहित्यिक, पटकथा लेखक व चित्रपट निर्माते राजिंदर सिंग बेदी यांचे नातू असलेल्या रजत बेदी यांच्यासाठी मराठी सिनेमाशी जोडले जाणे हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
राजिंदर सिंग बेदी यांनी ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘देवदास’, ‘एक चादर मैली सी’, ‘अनुपमा’ आणि ‘सत्यकाम’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे लेखन करून हिंदी चित्रपटसृष्टीतील आपले महत्त्व अधोरेखित केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे सुपुत्र नरेंद्र बेदी यांनीही यशस्वी चित्रपट निर्माते म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘बंधन’, ‘जवानी दिवानी’, ‘खोटे सिक्के’, ‘बेनाम’, ‘रफू चक्कर’ आणि ‘सनम तेरी कसम’ यांसारखे लोकप्रिय चित्रपट त्यांनी दिले. विशेषतः ‘बेनाम’ आणि ‘अदालत’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट ठरले. या दोन्ही चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील या दोन दिग्गजांचा कलात्मक वारसा पुढे नेत रजत बेदी आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. त्यामुळे ‘बंधू’शी त्यांचे जोडले जाणे ही बेदी कुटुंबासाठीही महत्त्वाची घटना ठरत आहे.
रजत बेदी आणि जेएसडी (JSD) स्टुडिओ यांनी ‘ट्रायफ्लिक्स एंटरटेनमेंट’च्या (TRIFLIX Entertainment) सहयोगाने ‘बंधू’ हा चित्रपट सादर केला आहे. नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
 
रजत बेदी यांनी आपल्या rajat bedi कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली. १९९४ मध्ये त्यांनी ‘ग्लॅडरॅग्ज मॅनहंट’ (Gladrags Manhunt) ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर ‘२००१: दो हजार एक’ (2001: Do Hazaar Ek) या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, ‘कोई… मिल गया’ (Koi… Mil Gaya) मधील भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. पुढे ‘जोडी नंबर १’, ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘रक्त’, ‘अक्सर’ आणि ‘पार्टनर’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.
अभिनय क्षेत्रात काही काळानंतर रजत बेदी यांनी पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ (Bads of Bollywood) या दिग्दर्शित मालिकेद्वारे त्यांनी अभिनय विश्वात पुनरागमन केले असून, त्यांच्या या नव्या इनिंगची सध्या बरीच चर्चा होत आहे. त्यांच्या कामाला चांगली पसंतीही मिळत आहे.
अभिनयासोबतच रजत बेदी यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे ‘बंधू’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता म्हणून त्यांचा सहभाग हा केवळ व्यावसायिक भागीदारीपुरता मर्यादित नसून, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मराठी चित्रपटसृष्टीला मिळण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.