मुंबई
Rohit back as Mumbai Indians captain? आयपीएल 2026 च्या हंगामात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 2027 च्या आयपीएल हंगामासाठी संघाच्या नेतृत्वात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधारपदासाठी दोन नावं चर्चेत असून, या निर्णयाच्या प्रक्रियेत माजी कर्णधार रोहित शर्माचाही महत्त्वाचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करणार का, अशी चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र, रोहितला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स नव्या चेहऱ्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. मात्र, सध्या तिलक वर्माच्या नावाचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे
2026 च्या खराब हंगामानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समधून ट्रेड केलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक फ्रँचायझींनी त्याच्यामध्ये रस दाखवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप ट्रेडबाबत कोणतीही ठोस घडामोड झालेली नाही. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससोबतही याबाबत काही चर्चा केल्याची माहिती आहे. कॅमेरून ग्रीनचं नाव संभाव्य ट्रेडमध्ये समोर आलं होतं. मात्र, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या व्यस्त कसोटी वेळापत्रकामुळे त्याच्या वर्कलोडबाबत मुंबईच्या टीम मॅनेजमेंटला चिंता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला ट्रेड करण्याऐवजी खेळाडू म्हणून संघात कायम ठेवण्याची शक्यता अधिक असल्याचं समोर आलं आहे. मुंबई इंडियन्सला मात्र नव्या कर्णधारासह संघाला नवी दिशा द्यायची आहे.